नागपूर : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाल संपल्यानंतर त्यावर बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झालेले पाहायला मिळालं. पण पंतप्रधान मोदी यांचे अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत, ते देशातील जनतेला माहिती आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 77 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनात शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसत नाहीत का? असा सवालही नाना पटोले यांनी केलाय. पटोले यांनी आज नागपुरात दिक्षाभूमिला वंदन केलं.(Nana Patole criticizes PM Narendra Modi)
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर पटोले प्रथमच नागपुरात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी दिक्षाभूमिवर जात वंदन केलं. जनतेला भाजप विरोधात उभं करण्याची प्रेरणा या दिक्षाभूमीतून घेऊन जात असल्याचं यावेळी पटोले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली. नरेंद्र मोदी यांनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं. लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही, अशा शब्दात पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत बोलताना आपल्याला हायकमांडनं ऊर्जा देण्याचं काम केलं. ही ऊर्जा पुढे नेण्याचं काम आता करणार असल्याचं सांगितलं. नाना पटोले यांना मंत्रिपद मिळण्याबाबतही चर्चा सुरु आहे. त्यावर बोलताना नाना पटोलेंचा खुर्चीचा विषय नाही. त्यामुळे ते सोडून बोला, असं ते म्हणाले. नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार? हे हायकमांड ठरवेल. आता काँग्रेसमध्ये गटबाजी दिसणार नाही, असा दावाही यावेळी पटोलेंनी केलाय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी राजधानी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी काँग्रेसला राज्यात एक नंबरचा पक्ष बनवणार आणि त्यासाठी वाटेल ते कष्ट घेणार, असा निर्धार व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचं संघटन अधिक मजबूत कसं करता येईल, येणाऱ्या काळात कोणते धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, यासंबंधीची चर्चा झाल्याची माहिती पटोले यांनी दिली. तसंच मोदी प्रचाराले आले पण हरलो नाही, आता काँग्रेसला नंबर 1 करणार, असा दावाही त्यांनी केलाय.
संबंधित बातम्या :
नितीन राऊतांचं ऊर्जा खातं नाना पटोलेंकडे जाणार? दोघेही एकाच वेळेस सोनियांच्या भेटीला
मोदी प्रचाराले आले पण हरलो नाही, आता काँग्रेसला नंबर 1 करणार, नाना पटोलेंचा दिल्लीत निर्धार
Nana Patole criticizes PM Narendra Modi