पुणे : एकीकडे राज्यात युती, आघाडी होत असली तरी दुसरीकडे मात्र पुण्याच्या जागेचा तिढा अजून कायम आहे. पुण्यात काँग्रेसने निष्ठावंतांना बाजूला सारल्यामुळे पक्षाची मोठी डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बैठक घेऊन पक्षातील वाद सोडवावा लागला. आयात उमेदवार लादू नका हेच म्हणणं या बैठकीत मांडण्यात आलं.
पुणे लोकसभेच्या जागेसाठी सत्ताधारी भाजपपेक्षा काँग्रेसच्या इच्छुकांची यादी मोठी आहे. मात्र या यादीत मूळ काँग्रेसीपेक्षा बाहेरील आयात उमेदवारांचीच चर्चा जास्त आहे. यामध्ये भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंचं नाव काँग्रेकडून चर्चेत असतानाच अचानक प्रवीण गायकवाड यांचंही नाव पुढे आलं. या दोन्ही नांवाबद्दल काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. यामुळे पृथ्वीराज चव्हाणांना थेट पुण्यात येऊन काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची मनधरणी करावी लागली.
वाचा – पवारांनी नाव सुचवलं, राहुल गांधींनी होकार दिला, काँग्रेसचा पुण्यातला उमेदवार ठरला!
त्यातच माजी आमदार उल्हास पवार यांनीही आता उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीचा पेच वाढला आहे. शिवाय त्यांनी थेट लेटरबॉम्ब टाकून काँग्रेसच्या आजच्या स्थितीवरच टीका केली. पुण्यातून काँग्रेस पक्षाच्या कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही एकदिलाने काम करून त्याला निवडून आणू, मात्र बाहेरील उमेदवार आमच्यावर लादू नका, अशा भावना यावेळी शहर काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी या बैठकीत मांडल्या. त्यामुळे आता पुण्याच्या जागेचा तिढा आणखीच वाढला.
राहुल गांधींकडून प्रवीण गायकवाडांच्या नावाला हिरवा कंदील?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसने या जागेसाठी उमेदवार आयात केल्याची चर्चा आहे. संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष प्रवीण गायकवाड काँग्रेसच्या तिकिटावर पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार असतील, असं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे नाव सुचवलं होतं. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हिरवा कंदील दाखवला.
जातीय समीकरणे लक्षात घेत काँग्रेसने प्रवीण गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. प्रवीण गायकवाड यांच्या जनसंपर्काचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होईल, असा अंदाज लावला जात आहे. शिवाय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जे वातावरण तापलं होतं, त्याचाही राष्ट्रवादी-काँग्रेसकडून फायदा घेतला जाऊ शकतो.