नवी दिल्ली : खातेवाटप आणि सरकारमधील भागीदारीवरुन महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अधिक गुंतागुंतीचा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेसोबत राष्ट्रवादीची वाटाघाटी होऊ न शकल्यामुळे काँग्रेसने पाठिंब्याचं पत्र (Congress Support to Shivsena Doubtful) न दिल्याचं म्हटलं जात आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन करुन सत्तेमध्ये भागीदारी करण्यावर चर्चा केली असता, आपला वाटा काय असेल अशी विचारणा केली होती. सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादीची हिस्सेदारी आणि वाटा निश्चित झाल्यास आपण पाठिंब्याचं पत्र देऊ, असं सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सत्तेतील भागीदारीवर शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा न झाल्यामुळे काल रात्री काँग्रेसने पाठिंब्याचं पत्र दिलं नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणूगोपाल, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे मुंबईत येणार आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र नाहीच
काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचं मन वळवण्यात पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना यश आल्याची चर्चा काल होती. मात्र अजून त्याबाबत स्पष्टता आलेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली. शिवसेना नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे मुदतवाढ मागितली, पण राज्यपालांनी नकार दिला.
काँग्रेस शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्यास राजी झाल्याचं सांगण्यात आलं. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याची पत्रं देण्यात आल्याचीही माहिती पुढे आली. त्यामुळे महाराष्ट्रात आता महासेनाआघाडीचं सरकार येणं जवळपास निश्चित मानलं जात होतं. इतकंच काय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी अटकळ बांधली गेली. परंतु काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यामुळे या चर्चेतील हवा निघाली.
शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र राज्यपालांनी मुदतवाढ दिलेली नाही.
शिवसेनेला पाठिंबा देण्यास सोनिया गांधी तयार नव्हत्या. दिवसभर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी त्यांची समजूत काढली. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार, राजीव सातव अशा नेत्यांनी दिल्ली दरबारी हजेरी लावली.
विरोधी विचारधारेच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यास इतर राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेसची अडचण होईल, अशी सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची धारणा आहे. त्यानंतर शरद पवार यांची सोनिया गांधी यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा झाली. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनीही फोनवरुन सोनिया गांधींशी संवाद साधला. (Congress Support to Shivsena Doubtful)