धारावीत भगवं वादळ…उद्धव ठाकरे पायी निघाले, महामोर्चात काँग्रेसचीही एन्ट्री; शरद पवार गटाची पाठ

| Updated on: Dec 16, 2023 | 5:11 PM

अदानी उद्योग समूहाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. स्वत: उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. धारावी टी जंक्शनपासून उद्धव ठाकरे पायी चालत बीकेसीपर्यंत आले. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते, काँग्रेस नेते, आमदार, खासदार आणि डाव्या पक्षांचे नेतेही होते. अदानी उद्योग समूहाला देण्यात आलेल्या धारावी प्रकल्पात त्रुटी असल्याने या प्रकल्पाला विरोध करण्यात येत आहे.

धारावीत भगवं वादळ...उद्धव ठाकरे पायी निघाले, महामोर्चात काँग्रेसचीही एन्ट्री; शरद पवार गटाची पाठ
Uddhav Thackeray
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : अदानी उद्योग समूहाला धारावी पुनर्वसन प्रकल्प देण्यात आला आहे. या प्रकल्पात अनेक त्रुटी असल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. अदानी उद्योग समूहा विरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाच्या निमित्ताने धारावी ते बीकेसी परिसरात भगव तुफान आवतरलं आहे. उद्धव ठाकरे स्वत: पायी चालत बीकेसीपर्यंत आले आहेत. अदानी विरोधातील या मोर्चात काँग्रेसचीही एन्ट्री झाली आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने या मोर्चाकडे पाठ फिरवली आहे.

एकूण सात मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. धारावी टी जंक्शनपासून या मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा बीकेसी मैदानापर्यंत आला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, अरविंद सावंत, विनायक राऊत, सचिन अहिर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल देसाई, बाबूराव माने आणि काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड आदी नेते या मोर्चात सामील झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात धारावी टी जंक्शनपासून सर्वच नेते पायी चालत बीकेसी मैदानापर्यंत आले. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. मोर्चेकऱ्यांनी घोषणांनी हा परिसर दणाणून सोडला होता.

भगवं तुफान

धारावी ते बीकेसी दरम्यान आज भगवं तुफान अवतरलं होतं. सर्वांच्या हातात भगवे झेंडे होते. भगव्या टोप्या आणि उपरणे घालून आले होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण भगवमय झालं होतं. शिवसैनिक सरकारच्या विरोधात आणि अदानीच्या विरोधात जोरदार घोषणा देत होते. धारावीतील लोकही या मोर्चात मोठ्या प्रमाणावर सामील झाले होते. त्यामुळे संपूर्ण धारावी ते बीकेसी परिसर भगव्या वादळाने दणाणून गेला होता.

काँग्रेसची एन्ट्री

या मोर्चात सर्वाधिक लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे काँग्रेसची एन्ट्री. काँग्रेसच्या नेत्यांनीही या मोर्चात भाग घेतला. काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या मोर्चात अग्रभागी होत्या. वर्षा गायकवाडही अदानींच्या विरोधात घोषणा देत होत्या. मोर्चात काँग्रेसचे झेंडेही झळकत होते. तसेच कम्युनिस्ट पार्टीचे झेंडेही या मोर्चात दिसत होते. मात्र, शरद पवार गटाचा एकही नेता या मोर्चात आला नाही. त्यामुळे अदानीच्या मुद्दयावर महाविकास आघाडीत बेबनाव असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.