नागपूर : “काँग्रेसनं देशात 55-60 वर्षे सत्ता भोगली, पण दलितांचा फक्त व्होटबँक म्हणून वापर केला. संविधानाचा बाप असलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काँग्रेसने एक इंचंही जागा दिली नाही. आम्ही सत्तेत आल्यावर तीन दिवसांत इंदू मिलच्या जागेची परवानगी आणली”, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. नागपुरातील भाजपच्या विजयी संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. भाजपच्या या विजयी संकल्प सभेला देशभरातील अनुसूचित जातीचे 25 हजारपेक्षा जास्त लोक आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नितीन गडकरींनीही काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. “काँग्रेसने आणीबाणी आणली, 80 वेळा देशाचं संविधान बदललं, तोच काँग्रेस पक्ष भाजप संविधान बदलणार, असं विष पसरवत आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. दलितांचा फक्त मतांसाठी वापर करणारी काँग्रेस महाराष्ट्रात येऊन दलित-दलित करत आहे” असंही गडकरींनी नमूद केलं.
“आजपर्यंत काँग्रेसने अनुसूचित जातीचा फक्त मतांसाठी वापर केला. आम्ही दलितांसाठी विकास कामं केलीत. भाजप संविधान बदलणार, असे विष काँग्रेसकडून पसरवलं जातंय”, असा घणाघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केला.
“शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही आणि अर्धा पगार आम्ही, हिच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची रोजगार हमी” अशा शब्दात गडकरींना काँग्रेसवर टीका केली.
दरम्यान राजनाथ सिंह म्हणाले, “दलितांसाठी काम करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाएवढी देशात मोठी संघटना नाही. संघ आणि भाजपही दलितांसाठी अनेक समाजकल्याणाची कामं करत आहेत”
भाजपच्या या विजयी संकल्प सभेत राज्यातील प्रमुख अनुसूचित जातीतील मंत्री आणि आमदारांची उपस्थिती होती. आगामी निवडणुकीत दलित समाजाच्या मतांवर डोळा ठेऊन भाजपनं विजयाचा संकल्प केला. पण तो पूर्ण होणार का हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच ठेरलं.