हिंगोली : स्थानिक पातळीवरील निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असतात. या स्तरावरुनच राज्य आणि देशपातळीवरील राजकारणाची पायाभरणी केली जात असते. त्यामुळेच सर्वच पक्ष स्थानिक पातळीवर लक्ष देतात. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही एक महत्त्वाचं समीकरण पाहायला मिळालं.
आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागलं होतं. चार जण बिनविरोध उमेदवार निवडून आल्याने 14 उमेदवारांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर एकच गर्दी झाली होती.
सहा फेऱ्यात मतमोजणी झाली. यामध्ये यापूर्वीच काँग्रेसचे चार बिनविरोध उमेदवार निवडून आले होते, तर निवडणुकीत 7 असे एकूण 11 उमेदवार निवडून आले. तर भाजप-शिवसेनेचे 7 उमेदवार निवडून आले. त्यामुळे बाजार समितीवर काँग्रेस आघाडीचंच वर्चस्व राहिलं.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालकपदासाठी होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष होतं. एवढंच नाही, तर एका मताची किंमत काय असते ते याचा अनुभव एका उमेदवाराला आला आहे. यामध्ये जलाल धाबा येथील गणेश लोंढे हा उमेदवार एका मताने पडला आहे.
निवडणूक केंद्राबाहेर विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला. निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे वर्चस्व असल्याने याचा फायदा काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी होणार आहे. खासदार राजीव सातव यांच्या बालेकिल्ल्यात संक्रांतीच्या दिवशीच कृबाचे उमेदवार निवडून आल्याने संक्रात गोड झाली आहे.
विजयी उमेदवारांना पडलेली मते
दत्ता बोंढारे, (आखाडा बाळापूर) 1320, दत्तात्रय माने (शेवाळा) 1359, भरत देशमुख (घोडा)1158, किशन कोकरे (कांडली) 1178, नितीन कदम (वारंगा) 1058, मिराबाई अडकिने (डोंगरकडा) 1465, मारोती पवार (जवळा पांचाळ) बिनविरोध, साहेबराव जाधव (दांडेगाव) बिनविरोध, बालासाहेब पतंगे (पेठवडगाव) 1030, अनिल रणखांब (सिंदगी) बिनविरोध, देशमुख वसंतराव (नांदापूर) 930, संजय भुरके (पिंपळदरी) 1048, विठ्ठल पोले (जलाल धाबा) 761, कावेरीबाई सावळे (बिनविरोध), धुरपत पाईकराव (कोथळज) 962, तर ईश्वर चिठ्ठी नुसार व्यापारी मतदारसंघाचे अमिल कंठवार, सुनील दामोदर 17, बाळासाहेब गावंडे 20, शेख मो. शेख गोस मो.रजाक 24 असे उमेदवार निवडून आले.