गजानन उमाटे, नागपूरः देशातील सामान्य गरीब माणसाला अर्थसंकल्पातून (Budget 2023) हद्दपार केलं आहे. देशात एकिकडे श्रीमंत अधिकच श्रीमंत होत चाललेत तर गरीब आणखीच गरीब होत चालले आहेत, याचं बॅलन्स कसं करणार, असा सवाल काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलाय. उपेक्षित माणसाला प्रवाहाबरोबर आणण्याचं काम अर्थसंकल्पाद्वारे होणं अपेक्षित होतं, मात्र केंद्रीय अर्थसंकल्पाकडून देशाची निराशा झाल्याची प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कारकीर्दीतील पाचवा अर्थसंकल्प मांडला. त्यावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे.
दीड टक्का उद्योगपतींकडे 90 टक्के संपत्ती आहे आणि उर्वरीत लोकांकडे उरलेली १० टक्के संपत्ती आहे, याचं बॅलेन्स कसं करणार, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय. अर्थसंकल्पात ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीसाठी काहीच नाही. शहरात रोजगारासाठी तरुणांचे लोंढेच्या लोंढे जात आहेत, त्याला थोपवण्यासाठी काहीच उपाययोजना नाहीत. गावा-गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काहीही प्रयत्न नसल्याचं ते म्हणाले.
ओबीसीसाठी अर्थसंकल्पात काहीच दिसलं नाही. ओबीसी हा देशाचा कणा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात 23 ओबीसी मंत्री आहेत. मात्र ओबीसींना 23 योजनापण दिल्या नाहीत. महाराष्ट्राच्या वाट्यालाही काहीच नाहीत. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेट बनवले असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांनीही केंद्र सरकार विरोधी भूमिका घेतली. या बजेटमधून मध्यमवर्गियांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेलं हे बजेट आहे.
समाजातला महत्त्वाचा घटक अल्पसंख्यांक आहे. त्यांचा कुठेही उल्लेख झाला नाही. मागील 7-8 वर्षांपासून महाराष्ट्रावर अन्याय सुरु आहे. तर कर्नाटक राज्याला 6 ते 7 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. कर्नाटक विधानसभेची निवडणूक ही देशातल्या विद्यमान पक्षाला महत्त्वाची वाटत असेल. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला सापत्नपणाची का, हा प्रश्न माझ्यासारख्या खासदाराला पडल्याची प्रतिक्रिया सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
कृषी क्षेत्रासाठीही भूलथापा देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुपटीने वाढवण्याचं आश्वासन दिलं. मात्र तेही पोकळ असल्याचं सिद्ध झालंय. शेतकऱ्याचं उत्पन्न खऱ्या अर्थानं कृषीमंत्री शरद पवार यांनी वाढवल्याची प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली.