जालनाः वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत गेल्याने महाराष्ट्रातील शिंदे (Eknath Shinde) सरकार तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारवर विरोधकांनी टीकासत्र सुरु केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने शिंदे सरकारला धारेवर धरलंय. तर काँग्रेसनेही यावरून सडकून टीका केली आहे. आता जालन्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून या घटनेचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जाणार आहे. जालन्यातील युवक काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करणार आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पामार्फत महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना रोजगार मिळणार होता. मात्र आता तरुणांचा रोजगार हिरावल्याची भावना राज्यातील जनतेत आहे. मागील वर्षीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार दिवस असा ट्विटरवर ट्रेंड दिसून आला होता. आता वेदांता प्रकल्पामुळे हा ट्रेंड पुन्हा एकदा दिसून येणार असं दिसतंय.
येत्या 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त भाजपातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत नेल्याने जालन्यातील युवक काँग्रेस कार्यकर्ते निषेध व्यक्त करणार आहेत. एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेल्याने एक लाख लोकांना रोजगार मिळणार होता तो मिळणार नाही. युवक काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस हा दिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करणार, अशी माहिती युवक काँग्रेसचे राज्य अध्यक्ष कुणाल राऊत यांनी जालन्यात दिली आहे.
वेदांता प्रकल्पावरून आज शिंदे सरकारला विरोधकांनी चांगलंच घेरलं. पुणे आणि मुंबईत राष्ट्रावादी काँग्रेसने तीव्र आंदोलन केलं. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालय परिसरात मोर्चा काढला. तर पुण्यातही खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मुंबईत काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकडही झाली. तर राज्यभरात युवा सेनेतर्फे ‘खोके सरकारच्या या कृतीचा निषेध’ अशा आशयाच्या बॅनरवर स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. मुंबईसह, पुणे, नाशिक, परभणी आदी जिल्ह्यांत या मोहिमेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला.