उस्मानाबाद : देशात काँग्रेस सरकार 100 टक्के येणार नाही याबाबत खात्री असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात निवडणुकीची मॅच फिक्सिंग आहे, असा आरोप भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. इम्रान खान याने पुलवामा हल्ल्याबाबतही बोलावे, त्यांच्याकडे काय माहिती आहे हे सांगावे अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. इम्रान खान यांनी मोदी सरकार 2019 मध्ये आल्यास दोन्ही देशात शांततेची बोलणी सुरु होईल आणि काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास या चर्चेला बाधा येईल, असं वक्तव्य केलं. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांच्या प्रचारासाठी उस्मानाबादमध्ये आले असता प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी संपूर्ण राज्यभर सभा घेत आहेत. असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप पक्षाने वंचित बहुजन आघाडी निर्माण केली आहे.
देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान
देशभरातील 91 जागांवर पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात जागा आहेत, ज्यात नागपूर, रामटेक, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये अनुक्रमे 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.