मुंबई : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही राज्य भाजपच्या हातून गेल्यात जमा आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. मध्य प्रदेशमध्ये अटीतटीची लढत सुरु आहे. पण इथे अपक्ष आणि छोट्या पक्षांची निर्णायक भूमिका असेल. राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारुन आज बरोबर एक वर्ष झालंय, नेमकं याच दिवशी काँग्रेसने त्यांना भेट म्हणून दोन राज्यातली सत्ता दिली आहे.
नरेंद्र मोदी 2014 ला पंतप्रधान झाल्यानंतर काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील राज्य हिसकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. काँग्रेसला जवळपास सर्वच राज्यांमधून हद्दपार करण्याचा चंग बांधणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. काँग्रेसच्या हातून भाजपने मोदी लाटेवर सवार होत अनेक राज्य हिसकावली. पण भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊन काँग्रेसने गेल्या 15 वर्षांचं सिंहासन उखडून टाकलंय.
छत्तीसगड हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपची या राज्यात गेल्या 15 वर्षांपासून सत्ता आहे. पण यावेळी भाजपचा दारुण पराभव झालाय. काँग्रेसने 90 जागा असलेल्या या राज्यात 65 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला 20 जागांपर्यंतही जाता आलं नाही.
काँग्रेसमुक्त भारतचा नारा देत, देशाच्या नकाशावर सगळीकडे भगवा चमकवणाऱ्या भाजपाध्यक्ष अमित शाह आणि नरेंद्र मोदींसाठी हा धक्का आहे. कर्नाटक हे काँग्रेसच्या ताब्यातलं राज्य भाजपला हिसकावून घेता आलं नव्हतं. काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपद देत हे राज्य भाजपच्या ताब्यात जाऊ दिलं नाही. पण राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला मोठा धक्का दिलाय.
भाजपने काँग्रेसकडून हिसकावलेली राज्य
2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने काँग्रेसच्या ताब्यातलं प्रत्येक राज्य जिंकलं. काँग्रेसमुक्त भारताचा नाराच भाजपने दिला. त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, हरियाणा, महाराष्ट्र, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये भाजपने सत्ता मिळवली.
काँग्रेसने ईशान्येकडील एकमेव राज्यही गमावलं
काँग्रेसने तीन मोठी राज्य मिळवली असली तरी ईशान्य भारतातील मिझोराम हे एकमेव राज्यही गमावलं आहे. त्रिपुरा हे राज्य भाजपने डाव्यांकडून हिसकावलं. नागालँड, मणिपूर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये भाजप एनडीएतील घटकपक्षांसह सत्तेत आहे. तर आसाममध्येही स्वबळावर सत्ता मिळवली होती.