मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या पुस्तकाला देशभरातून जोरदार विरोध झाला. त्यानंतर अखेर हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे (Controversial book on Shivaji Maharaj). भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. यावेळी त्यांनी या पुस्तकाचा आणि भाजपचा काही संबंध नसल्याचं म्हणत या प्रकरणातून हात झटकण्याचाही प्रयत्न केला.
प्रकाश जावडेकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होवू शकत नाही. नुकत्याच प्रकाशित पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले. हा वाद आता संपला आहे.”
नुकत्याच प्रकाशित पुस्तकाचा @BJP4India शी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले. हा वाद आता संपला आहे.#ShivajiMaharaj @BJP4Maharashtra
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) January 13, 2020
विशेष म्हणजे या पुस्तकाचे लेखक भाजप नेते जय भगवान गोयल यांनी आज दुपारपर्यंत या प्रकरणावर माफी मागण्यास किंवा पुस्तक मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. तसेच विरोध करणाऱ्यांनी आधी पुस्तक वाचावं असं म्हटलं होतं. मात्र, अचानक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून या प्रकरणात माघार घेण्याची भूमिका घेण्यात आली.