जळगाव : देशात सध्या महागाई (Inflation) सर्वोच्च स्थराला पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरापासून ते खाद्य तेलाच्या भावापर्यंत सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. भाजीपाला तसेच अन्नधान्य देखील महागले आहे. तीनच दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आल्याने घरगुती गॅस सिलिंडरचे (Gas cylinder) दर हजार रुपयांवर पोहोचले आहेत. एक मेला व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. सीएनजी, पीएनजीचे भाव वाढत आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे मात्र माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महागाईचे समर्थन केले आहे. ते चाळीसगावमध्ये बोलत होते. त्यांना महागाईबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी महागाईचे समर्थन केले आहे. इतर कोणताही पक्ष महागाईचे समर्थन करण्याचे धाडस दाखवणार नाही, मात्र मी हे धाडस करतो. महागाई कुठे आहे, सोन्याचे दर 20 हजार रुपयांहून 50 हजारांवर पोहोचले आहेत, म्हणून कोणी सोने खरेदी करणे सोडले आहे का? सोन्याची मागणी वाढतच आहे. माहागाईमुळे लोक दारू पीणे सोडतात का असा प्रति प्रश्नही त्यांनी यावेळी केला.
सदाभाऊ खोत हे चाळीसगावमध्ये आले असताना त्यांना महागाईबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, यावेळी खोत यांनी महागाईचे समर्थन करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. इतर कोणताही पक्ष महागाईचे समर्थन करण्याचे धाडस करणार नाही, मात्र मी ते धाडस करतो. मला सांगा महागाई कुठे आहे? सोने 20 हजार रुपये तोळ्यावरून 50 हजारांवर पोहोचले मात्र लोक सोने खरेदी करतच आहेत. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणे सोडले का असा प्रश्नही यावेळी सदाभाऊ खोत यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, उलट कांदा, डाळींच्या किमती वाढल्या तर शेतकरी सुखी होईल, महागाईचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो असे खोत यांनी म्हटले आहे.
दरम्यान तीन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आल्याने सिलिंडरचे दर 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत. एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली होती. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या वतीने केंद्रावर निशाणा साधण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले होते.