पुणे : पुणे महापालिकेचे महापौर आणि शिवसेना गटनेत्यांच्या केबिन नूतनीकरणावर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व केबिन्सच्या डागडुजीवर काही दिवसांपूर्वीच लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र असं असतानाही पुन्हा एकदा ही उधळपट्टी,विशेष म्हणजे वास्तूदोष दूर करण्यासाठी नूतनीकरण करत असल्याचा अजब दावा शिवसेनेच्या नवनियुक्त गटनेत्यांनी केला आहे. याप्रकरणी विरोधीपक्षांनी कारवाईची मागणी केली आहे.
पुणे महापालिकेच्या महापौर आणि गटनेत्यांच्या केबिनमध्ये जुने फर्निचर काढून, नूतनीकरणाकरणाचे काम सुरू आहे. गरज नसतानाही अशा पद्धती नूतनीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे.
विशेष म्हणजे गेल्या महिन्यापूर्वी या सर्व केबिन्सचे काम करण्यात आले होते. मात्र असं असतानाही या केबिन्सचं पुन्हा एकदा नूतनीकरण करण्यात आलं. विशेष म्हणजे वास्तूदोष दूर करण्यासाठी केबिन्सचे नूतनीकरण करत असल्याचा अजब दावा शिवसेनेचे नवनियुक्त गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला आहे.
या उधळपट्टीवर विरोधीपक्षांनी जोरदार टीका केली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून आणि महापौर आणि सेना गटनेत्यांकडून हा खर्च वसूल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
काही महिन्यांपूर्वीच या सर्व केबिन्सचे काम करण्यात आले होते. मात्र वास्तुदोष आणि आपल्या मनासारखे काम करून घेण्यासाठी अशा पद्धतीने लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. जो सर्वसामान्य पुणेकरांच्या करातून जमा झालेल्या पैशांवरच हा डल्ला आहे.