औरंगाबाद : विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक अजब दावा केला आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नाडीवर हात ठेवून मी त्यांना वाचवलं असतं, असा दावा चंद्रकांत खैरेंनी केलाय. औरंगाबाद येथे सुरु असलेल्या सरकारच्या आरोग्य शिबिरात खैरेंनी हा दावा केलाय. विशेष म्हणजे खैरेंच्या समोर हे वक्तव्य करताना सरकारच्या आरोग्य शिबीरातील अनेक तज्ञ डॉक्टर बसलेले होते.
प्रमोद महाजनांवर त्यांच्या भावाकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते अत्यवस्थ होते. मला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. मी पोहोचलो असतो तर नाडीवर हात ठेवून आणि जप करुन त्यांना वाचवू शकलो असतो, असा दावा खैरेंनी केला आणि उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या.
प्रमोदजी रूग्णालयात असताना गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं तू काही तरी कर… सिद्धिविनायक मंदिरात जा.. काहीतरी फूल वगैरे घेऊन ये… माझ्याकडे एक पुडी होती. तो अंबाबाईचा अंगारा होता, तो मी राहुलकडे दिला. राहुलला सांगितलं प्रमोदजींच्या उशीखाली ही पुडी ठेव. प्रमोद महाजन यांच्या उशीखाली ती पुडी ठेवल्यावर मी तिथे गेलो आणि जप केला. पण मला त्यावेळी प्रमोद महाजनांना हात लावता आला नाही. तिथे जाण्याची कुणाला परवानगी नव्हती. परवानगी मिळाली असती तर मी महाजनांना वाचवू शकलो असतो, असं खैरे म्हणाले.
गोळीबारानंतर 12 दिवसांनी प्रमोद महाजन यांचा मृत्यू झाला. त्याच एका कामात मला अपयश आलं, नाहीतर मला आतापर्यंत अशा प्रयोगांमध्ये एकदाही अपयश आलेलं नाही. डॉक्टरांची शक्ती असते तशी आमची सदिच्छा असते. मी अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगत नाही, खरोखरच सांगत आहे, असंही खैरे म्हणाले.
अनेकदा रूग्णालयांमध्ये जात असतो, कोणाला काही मदत हवी असेल तर मी शक्य तशी करतो. एका बाईला चालता येत नव्हतं, तेव्हा आपण तिला कसं बरं केलं याचाही अनुभवही खैरेंनी सांगितला. खैरेंच्या या दाव्यांमुळे मात्र उपस्थित असलेले लोक चांगलेच गोंधळले. त्यामुळे खैरेंनी किमान समोर बसलेल्या तज्ञ डॉक्टरांचा तरी विचार करायचा, अशीची कुजबूज सुरु झाली.
व्हिडीओ पाहा :