नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम (P Chidambaram custody) यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात जामीन नाकारण्यात आलाय. सीबीआयने मागणी केलेली चार दिवसांची कोठडी (P Chidambaram custody) न्यायालयाने मान्य केली. सीबीआय आणि ईडीने लूक आऊट नोटीस करत चिदंबरम यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील कोर्टात हजर करण्यात आलं. इथे दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
यापूर्वी सीबीआय कोर्टात दोन्ही पक्षांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आणि चिदंबरम यांच्या बाजूने काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी जोरदार युक्तीवाद केला. तुषार मेहता यांनीही सीबीआयसाठी रिमांडची मागणी केली.
या प्रकरणात कार्ती चिदंबरम यांना आरोप करण्यात आलंय आणि त्यांना दिल्ली हायकोर्टाकडून जामीनही मिळालाय. सुप्रीम कोर्टानेही जामीन देण्यास नकार दिलेला नाही. या प्रकरणातील इतर आरोपींना जामीन मिळालाय. या प्रकरणाला ज्या एफआयपीबी कडून मंजुरी मिळाली, त्यातील सहा सेक्रेटरी केंद्र सरकारचे होते, ज्यापैकी काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नरही बनले आहेत, काही निती आयोगात आहेत. पण त्यांच्यावर कधी कारवाई झाली नाही, अशी बाजू कपिल सिब्बल यांनी मांडली.
पी चिदंबरम यांना सकाळी अटक करावी, अशी विनंती सीबीआयला करण्यात आली. पण त्यांना रात्रीच ताब्यात घेतलं आणि सकाळी 12 प्रश्न विचारण्यात आले. रात्री एकही प्रश्न विचारला नाही. जे आरोप आहेत, ते कार्ती यांच्यावर असून ते सध्या जामिनावर आहेत. त्यामुळे पी चिदंबरम यांनाही जामीन आवश्यक आहे. सीबीआयचा चिदंबरम यांच्यावर काही आरोप आहे का? असाही सवाल सिब्बल यांनी केला.
ताब्यात घेतल्यानंतर ते (सीबीआय) काय करतील ते आम्हाला माहित आहे. त्यांना हवी असलेली गोष्ट माझ्या असिलाकडून म्हणवून घेतील. गेल्या रात्रीही चिदंबरम यांना झोपू दिलं नाही. पण 11 वाजता चौकशी सुरु केली. 12 प्रश्न विचारण्यात आले, ज्यापैकी 6 प्रश्नांची उत्तरं दिली. चिदंबरम यांना नेमके काय प्रश्न विचारले हे कोर्टाने सीबीआयला विचारावं, अशी मागणी सिब्बल यांनी केली.
चिदंबरम यांनाही बाजू मांडण्याची संधी कोर्टाने द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी कोर्टाकडे केली. सीबीआयने रिमांडची मागणी केली आहे, पण चिदंबरम यांच्यावर आरोप काय आहे? हे सांगितलेलं नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, सरकारची बाजू मांडत असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी चिदंबरम यांच्या बोलण्यावर आक्षेप घेतला. वकिलांच्या मध्ये आरोपीने बोलू नये, असं ते म्हणाले.