मुंबई : नवाब मलिक (Nawab Malik ED News) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे डी गँगसोबत संबंध होते, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवल्यांचं सांगण्यात येतंय. मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीनं (ED on Nawab Malik) चार्जशीट दाखल केली होती. गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी कट रचल्याचा ठपका ईडीनं नवाब मलिकांवर ठेवलाय. मंत्री नवाब मलिक यांनी हसीना पारकरसोबत (Haseena Parkar & Nawab Malik) वारंवार बैठका घेतल्या आणि मनी लॉड्रिंग केलं, असं प्राथमिक निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. रोकडे यांच्या खंडपिठानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. नवाब मलिक यांचा दाऊदच्या गँगमधील लोकांसोबत संबंध असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेल्यानं आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
हसीना पारकर, सरदार शाहवली खान यांच्यासोबत नवाब मलिक यांच्या बैठका झाल्या असल्याचा ठपका ईडीनं नवाब मलिक यांच्यावर ठेवलाय. ‘मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खानच्या संपर्कात होते’ असा आरोप करण्यात आलंय. D गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे.
नवाब मलिक यांच्यावरून राज्याच्या राजकारणात अजूनही जोरदार घमासान सुरू आहे. नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध आहे, असा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आलाय. तर ही कारवाई सूडबुद्धीने आणि भाजपच्या सांगण्यावर करण्यात आहे, असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करतायत.
राष्ट्रवादीचा दुसरा मंत्री जेलमध्ये गेल्याने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. नवाब मलिक यांनी गैरव्यववहार केला आणि तो पैसा थेट दाऊदकडे गेले, असा आरोप करत हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, असा भाजपनं म्हटलंय. त्यामुळे मलिकांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येतेय.
गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये असणार मंत्री नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर किडनी आणि इतर व्याधींबाबत उपचार केले जात आहेत. मलिक यांना सध्या कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मलिकांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची परवागी देण्यात यावी अशी मागणी ईडी कोर्टात करण्यात होती. त्यानंतर ईडी कोर्टाने त्यांना ही परवानगी दिल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.