Maharashtra politics : नवीन नाटक रंगमंचावर आले अन् राणेंच्या दशावतारी नाटकावर पडदा पडला; ‘सामना’मधून पुन्हा एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण

| Updated on: Jul 06, 2022 | 7:05 AM

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. सध्याचे सरकार म्हणजे उधारीचा माल असल्याचे म्हटले आहे.

Maharashtra politics : नवीन नाटक रंगमंचावर आले अन् राणेंच्या दशावतारी नाटकावर पडदा पडला; सामनामधून पुन्हा एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण
एकनाथ शिंदे, संजय राऊत
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई: शिवसेनेचे (shiv sena) मुखपत्र असलेल्या सामनामधून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. फडणवीस व एकनाथ शिंदे कशा गुपचूप पद्धतीने भेटत होते याचे रहस्यमय किस्से शिंदे यांनी सांगितले. आमदार झोपल्यावर ते निघायचे व उठण्याआधी परत यायचे अशा प्रकारे हे दोन ‘नाईट किंग’ काम करीत होते. आता दोनशे जागा निवडून आणण्याचा त्यांचा वायदा आहे. बाजारात नेहमी उधारी चालत असते. उधारी म्हणजे काय? माल आधी काही दिवस गिऱ्हाईकाने ताब्यात घ्यायचा व त्याचे पैसे दुकानदारास मागाहून द्यायचे. ती उधारी कधी कधी बुडवली जाते. शिंदे-फडणवीसांची ही वक्तव्ये म्हणजे बाजारातील ‘उधारीचा माल’ आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. पक्ष सोडताना नारायण राणे, छगन भुजबळ वगौरे नेते जसे भावुक झाले होते, तोच आव मुख्यमंत्री शिंदे यांनी आणला. ते हेलावले, अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. असे बरेच नाट्य घडले. राणे, भुजबळांनी विधानसभेत हेच संगीत नाटक केले होते. त्यापेक्षा शिंदे यांचे नाट्य वेगळे नव्हते. शिंदे यांचे नवीन नाटक रंगमंचावर आल्याने राणे यांच्या दशावतारी नाटकावर पडदा पडल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे.

संहिता मिठी नदीत फेकून देण्याची वेळ

सामनामध्ये पुढे म्हटले आहे की, त्याचप्रमाणे किरीट सोमय्या वगैरे विद्रोही नाटककारांवरही लोखंडी चणे चावत बसण्याची वेळ आली. संजय राठोड, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव दाम्पत्यावर कालपर्यंत लिहिलेल्या संहिता मिठी नदीत फेकून देण्याची आफत आता भाजपवाल्यांवर आली आहे. भाजपाच्या महिला मोर्चाच्या नेत्यांना तर धरणीने दुभंगून पोटात घ्यावे असेच वाटत असेल. दोन दिवसांत या मंडळींना तुरुंगात टाकण्याचे संवाद आता जाहीर पत्रकार परिषदांतून कोण फेकणार? कारण या सगळ्यांनाच भाजपने शुद्ध करून घेतले व देवघरात त्यांच्या प्रतिमा पूजेसाठी ठेवल्या. हे सर्व हिंदुत्वाचे व अन्यायाचे परिमार्जन अशा उदात्त नावाखाली झाल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

सध्याचे सरकार म्हणजे उधारीचा माल

सध्याचे सरकार म्हणजे उधारीचा माल आहे. त्यामुळे ही उधारी चुकवायची कशी? हाच प्रश्न आहे. शिवसेनेसाठी आपण कसा त्याग केला असे मुख्यमंत्री शिंदे म्हणतात. राणे व भुजबळांचेही तेच सांगणे होते. त्यागाच्या बदल्यात काय व किती मिळाले याचाही हिशेब द्यायला हवा. श्री. शिंदे यांचे एकवेळ मान्य करू, पण त्यांच्याबरोबर गेलेल्या किमान 25 आमदारांनी शिवसेनेसाठी केठे रक्त सांडले, कोठे लाठ्या खाल्ल्या घरावर कधी तुळशीपत्र ठेवले. हे राज्यातील जनतेला सांगितलेले बरे अशी घणाघाती टीका सामनाच्या आजच्या संपादकीयमधून करण्यात आली आहे.