मुंबई : ‘सामना’मधून (SAMANA) पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे, फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे. राज्याबाहेर जात असलेल्या प्रकल्पावरून शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.’महाराष्ट्र आपल्या पायावर आणि हिमतीवर उभा आहे व राहील; पण इतर मागास राज्यांना विकासात सहभागी करून घेतले जात नसेल तर ‘सबका साथ, सबका विकास’या मोदी यांच्या घोषणेतील फोलपणा समोर येतो. रुपयातील 80 पैसे गुजरातला व 20 पैशांत सारा देश हे गणित ठरले असेल तर गुजरातला सोन्यानेच का मढवीत नाही? तेही करा. कारण आजही गुजरातच्या पलीकडे सध्याच्या दिल्लीश्वरांची झेप जात नाही’, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.
‘सामना’मध्ये पुढे म्हटलं आहे की,’ महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील घाव आहे. महाराष्ट्राच्या इज्जतीचे अपहरण हे रष्ट्रीय अस्मितेचे वस्त्रहरण आहे. पण आपले मिंधे मुख्यमंत्री निर्विकारपणे सांगतात. ‘भाजप सोबत आल्याने मी आज समाधानी आहे’ छान! महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असे सेनापती बापट का सांगून गेले ते आता स्पष्ट झाले. मिंध्यांपासून महाराष्ट्राला वाचला!’ असा घणाघात सामनामधून करण्यात आला आहे.
‘महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार आले आहे व महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक असे उद्योग पळविले जात आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारखा महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. साधारण दीड लाख कोटींची गुंतवणूक राज्यात होणार होती. व एक लाखावर लोकांना रोजगार मिळण्याची खात्री होती. हा प्रकल्प केंद्राने गुजरातकडे खेचून नेला. त्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत नाही तोच टाटा एअरबस हा बावीस हजार कोटींचा प्रकल्प किडनॅप करून गुजरातेत नेल्याने महाराष्ट्रावर मोठाच आघात झाला आहे. प्रकल्प ठरवून मोदी- शहा यांच्या गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत, व त्या किडनॅपिंगवर राज्याचे मिंधे मुख्यमंत्री तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत’ अशी टीका समानामधून करण्यात आली आहे.