नवी दिल्ली : बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत (Guwahati) आहेत. मुंबई, पुण्यासह काही ठिकाणी आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. बंडखोर आमदारांच्या विरोधात पोस्टरबाजी केली जात आहे. यामुळं आमच्या कुटुंबीयांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या गटानं केली. त्यासाठी त्यांनी काल केंद्रीय गृहमंत्रालय आणि राज्यपालांना (Governor) पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता बंडखोर आमदारांच्या घराला सुरक्षा देण्याचं काम केंद्र सरकार करणार आहे. केंद्रानं आमदारांच्या कुटुंबीयांना वाय प्लस श्रेणीमधील सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. राज्यात काही ठिकाणी आमदारांच्या घरासमोर सीआरपीएफ (CRPF) जवान आज संध्याकाळी घराबाहेर तैनात केले जाणार आहेत.
सदा सरवणकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत गुवाहाटीला गेलेत. त्यांच्या मुंबईतल्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आलेत. दादर भागात राहणाऱ्या आमदार सरवणकर यांच्या घराबाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. बंडखोर आमदारांनी सुरक्षेसंदर्भात केंद्रीय गृहसचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होते. त्यानंतर आमदारांच्या कुटुंबीयांनी सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण 15 आमदारांच्या घरी सुरक्षा व्यवस्था पुरविली जाणार आहे. हे 15 आमदार कोण याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
आमदारांना केंद्राची सुरक्षा मिळाल्यानं शिवसेनेनं भाजपवर टीकास्त्र सोडलंय. शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले, या बंडखोरीमागे भाजपचं कारस्थान असल्याचं यातून स्पष्ट होतंय. राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर दाखविलेला हा अविश्वास आहे. राजकीय आकसापोटी राज्य सरकारनं आमदारांचे संरक्षण काढून घेतल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता.
राजधानी दिल्लीत पुन्हा पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. महाराष्ट्र सदनात मोठी सुरक्षा व्यवस्था पुन्हा तैनात करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस, निमलष्करी दल, रॅपिड अॅक्शन फोर्सची तैनाती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय संकटाला पाहता पोलिसांकडून दखल घेतली गेली. दिल्लीतील महाराष्ट्र सदन परिसरात पोलिसांच्या आणि रॅपिड एक्शन फोर्सच्या वीस गाड्या तैनात केल्या आहेत.