मुंबई : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Assembly Session) 17 ऑगस्टपासून सुरु होत आहे. अशावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाते. या समितीत प्रत्येक पक्षाचा सदस्य घेतला जातो. या पार्श्वभूमीवर अधिकृत शिवसेना (Shivsena) पक्ष म्हणून समितीच्या बैठकीला निमंत्रित करावं आणि समितीवर सदस्य नियुक्तीसाठी पत्र देण्यात यावं अशी मागणी शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते अजय चौधरी यांनी पत्राद्वारे प्रधान सचिवांकडे केली होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना झटका दिलाय. विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटातील दादा भुसे आणि उदय सामंत यांची विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत नियुक्ती करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार आणि 12 खासदार गेले. अशावेळी खरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. आम्हीच खरी शिवसेना असं ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही बाजुने सांगितलं जात आहे. त्यावरुन दोन्ही बाजुंनी सातत्याने आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल शेवाळे नुकतेच विराजमान झाले आहेत. त्यांनी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीमध्ये शिंदे गटातील उदय सामंत आणि दादा भुसे यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जातोय.
दरम्यान, कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांच्या नियुक्तीबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्व पक्षाच्या गटनेत्यांना विधिमंडळ सचिवांकडून पत्र ठावण्यात आलं. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तसं कुठलंही पत्र देण्यात आलं नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी अजय चौधरी यांची शिवसेना गटनेतेपदी आणि सुनील प्रभू यांची शिवसेनेच्या प्रतोदपदी नियुक्ती केली होती. असं असताना विधिमंडळ सचिवांकडून पत्र न आल्यानं अजय चौधरी यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहलं आहे.
शिंदे आणि फडणवीस सरकारचा महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. शिंदे गटातील 9 आणि भाजपच्या 9 अशा एकूण 18 मंत्र्यांना राज्यपाल कोश्यारी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर लगेत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. 17 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे.