बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांच्या प्रकरणाचा द एन्ड केला आहे. पत्रकारांनी राज ठाकरे यांच्यावर अजितदादांना प्रश्न विचारताच शिळ्या कढीला ऊत आणू नका, असं म्हणत अजितदादा पत्रकारांवर संतापले. आमच्या दृष्टीने राज ठाकरेंचा विषय संपला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आज अजित पवार बारामती दौऱ्यावर आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ते बारामतीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. बारामतीच्या कोव्हिड परिस्थितीची आढावा बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
राज ठाकरे यांच्यावर मी कालच पुण्यात उत्तर दिले आहे. सारखं सारखं शिळ्या कडीला ऊत आणण्याचं काम करु नका. तो विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे. ज्या लोकांना कुठे काही थारा लागत नाही ते लोक अशा प्रकारची नको ती विधानं करत असतात, असं सांगत विषय संपला म्हणताना त्यांनी जाता जाता राज ठाकरेंवर निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला होता. काल अजित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी याच मुद्द्यावरुन प्रश्न विचारला असता त्यांनीही राज ठाकरेंवर त्यांच्या स्टाईलमध्ये निशाणा साधला.
शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.
हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.
राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.
राज ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर देताना, “त्यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे”, असा सल्ला शरद पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना दिला होता.
हे ही वाचा :