मुंबई : माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार दीपक केसरकर (MLA Deepak Kesarkar) हे शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेकडून सावंतवाडीत उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत (Rally) मोठया संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. दीपक केसरकर यांच्या विरोधात व उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत ही रॅली दीपक केसरकर यांच्या घरासमोर येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या घरासमोर मोठयाने टाळ्या वाजवत घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik), अरुण दुधवडकर व जिल्ह्यातील अन्य नेते, पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले.
उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी काढण्यात आलेली रॅली दिपक केसरकर यांच्या घरासमोर आल्यावर शिवसैनिकांनी निम का पत्ता कडवा है दीपक केसरकर भडवा है अशाप्रकारच्या जोरदार घोषणा दिल्या. या रॅलीदरम्यान पावसाचे देखील आगमन झाले होते. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आता आरोप -प्रत्यारोपाचे राजकारण होताना दिसत आहे. काल केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली, केसरकर म्हणाले की, आदित्य ठाकरे हे डिसेंट आहेत, आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की शिवसेनेतून घाण गेली आणि पुन्हा तेच म्हणतात घाणीसाठी दरवाजे उघडे ठेवले हे कसं शक्य आहे? असा सवाल दिपक केसरकर यांनी उपस्थित केला होता.
दिपक केसरकर यांनी गूगल मिट घेऊन एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडली होती. यावेळी त्यांनी अनेक विषयांना हात घातला होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला आता जवळपास 7 दिवस होऊन गेले आहेत. एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसोबत आसाममध्ये आहेत. राज्यातील सध्याचे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे गट भाजपासोबत सत्तास्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे जवळपास स्पष्टच आहे. शिवसेनेकडून अजूनही बंडखोर आमदारांना चर्चेसाठी बोलवले जातंय.