मुंबई : (Shivsena) शिवसेना पक्षातून बंड, सत्तांतर आणि आता मंत्रिमंडळाचा विस्तार तोंडावर येत असतानाही शिंदे गटाचे प्रवक्ते (Deepak Kesarkar) दीपक केसरकर हे शिवसेना आणि शिंदे गट हे एकत्र यावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेकडून शिंदे गटातील (Rebel MLA) आमदारांवर टीकास्त्र हे सुरुच आहे. संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत गेल्यानंतर शिवसेनेकडून अरविंद सावंत, आदित्य ठाकरे हे शिंदे गटातील आमदरांवर टिका करीत आहेत.असे असले तरी शिवसेनेमध्ये पडणारी फूट ही महाराष्ट्राच्या हिताच्या नाही. मराठी माणसासाठी शिवसेना आणि शिंदे गटाने एकत्र यावे, अद्यापही वेळ गेली नसल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. एकीकडे खालच्या पातळीवरील टिका, रोज शिवसेना पक्षातून आउटगोइंग होत असताना केसरकर यांचे हे वक्तव्य अनेकांच्या भूवया उंचवणारे आहे. त्यामुळे एवढे ताणले गेले असतानाही केसरकर मात्र, अद्यापही आशावादी आहेत.
शिंदे सरकारची स्थापना होऊन महिना उलटला. या दरम्यानच्या काळात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्वत्र दौरे केले आहेत. त्यामुळे एकमेकांवर तर टिका ही झालीच पण आरोप-प्रत्यारोपाची मालिकाही सुरुच होती. असे असतानाही शनिवारी पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी माझी तुम्हाला विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही म्हणत एकत्र येण्याची हाक दिली आहे. शिवाय स्वप्नात न राहता वास्तवाचा स्विकार करा असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला आहे.
नारायण राणे आणि माझे संबंध हे जगजाहीर आहेत. असे असले तरी मतदार संघाच्या विकास कामासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची आपली तयारी असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे. मात्र, मी नारायण राणेंची तक्रार मोदींकडे केली यामध्ये कोणतेही तथ्य नाही. याबाबतच्या सर्व बातम्या ह्या खोट्या आहेत. अशा अफवा पसरत असल्या तर मात्र, यानंतर मी माझ्या पत्रकार परिषदेत नारायण राणेच्या विषयावर बोलणे टाळणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरेंना भाजपा सोबत युती करायची होती तेव्हा त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले होते असे नाही. मात्र, आम्ही भाजपासोबत केलेल्या युतीनंतर आम्हाला विश्वासघातकी किंवा गद्दार का म्हणतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंना भाजपा सोबत युती करायची होती या विधानाने राज्यात खळबळ उडाली होती. मात्र, त्यावर आपण ठाम असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे. एवढेच नाहीतर खरं आहे की खोटं याचे याचा खुलासा करावा असे आव्हानही त्यांनी ठाकरे यांना दिले आहे.