मुंबई : एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड केलं. त्यानंतर त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करणाऱ्या ठाकरेगटाच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayyad) मागच्या काही दिवसांपासून शांत होत्या. आता त्या शिंदेगटाच्या मार्गावर असल्याची चर्चा होतेय. काही दिवसांआधी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हाही त्यांच्या शिंदेगटातील प्रवेशाबाबत चर्चा झाली होती. तेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं म्हटलं होतं. शिंदेगटातील (Eknath Shinde) प्रवेशाबाबत होणाऱ्या चर्चांबाबत tv9 मराठीशी बोलताना त्यांनी खुलासा केला.
शिंदेगटातील प्रवेशाबाबत tv9 मराठीशी बोलताना त्यांनी खुलासा केला आहे.तुमच्या शिंदेगटातील प्रवेशाच्या चर्चा होत आहेत. तुम्ही सध्या कोणत्या गटात आहात? असं विचारलं असता. “मी सध्या शिवसेनेत आहे. वेट अँण्ड वॉच! “, असं दीपाली सय्यद म्हणाल्या.
वेट अँण्ड वॉच! या त्यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जेव्हा गरज होती तेव्हा मी बोलले. पण आता सतत टीव्ही स्क्रीनवर येऊन तू-तू, मै-मै करणं गरजेचं नाही. मी सध्या लोकांची कामं करतेय. बोलण्याइतकंच काम करणंही गरजेचं आहे. ते मी सध्या करतेय, असं दीपाली म्हणाल्या.
शिंदेगटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या गटात काही नेत्यांची एन्ट्री झाली. त्यात सुषमा अंधारे यांचाही समावेश आहे. सुषमा अंधारे यांच्या येण्याने दिपाली सय्यद बॅकफुटवर आल्याचं बोललं जातंय. त्यामुळे दीपाली सय्यद या शिंदेगटाचा मार्ग स्विकारतील, अशी चर्चा सध्या होत आहे.
शिंदेगटाचं बंड झाल्यानंतर दीपाली यांनी त्यांच्यावर परखड शब्दात टीका केली. शिवाय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची दिलजमाई करण्याचाही प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.