नांदेड : नांदेडमधील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Deglur Biloli) काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांचे सुपुत्र आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झाल्यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Deglur Vidhansabha Bypoll) 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या मतदारसंघात काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच आता काँग्रेसने अंतापूरकर यांच्याच कुटुंबात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रावसाहेब यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांना मैदानात उतरवून त्यांना जिंकून आणण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसच्या बैठकीत आज जितेश यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून शिवसेनेचे सुभाष साबणे इच्छुक आहेत. सुभाष साबणे हे माजी आमदार असून, त्यांनी रावसाहेब अंतापूरकर यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. सुभाष साबणे शिवसेना सोडून भाजपकडून उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहे. मुंबईत याबाबत भाजपची काल बैठक झाली. भाजपकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने माजी आमदार सुभाष साबणे याना संधी मिळू शकते.
सुभाष साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते आहेत. ते तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. 1999 ते 2009 या काळात ते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर 2004 मध्ये ते देगलूरमधून विधानसभेवर निवडून गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत (2019) ते देगलूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र रावसाहेब अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला होता.
काँग्रेस नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली मतदारसंघाची जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे आगामी काळात पोटनिवडणूक होणार आहे. याच कारणामुळे येथील राजकारण तापले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी पावलं टाकायला सुरुवात केली आहे.
देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे, त्यामुळे त्या जागेवर आम्ही त्याच पक्षाचा म्हणजेच काँग्रेसचाच उमेदवार देणार आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात आम्ही मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. या जागेवर आम्ही ‘पंजा’ चिन्ह असलेला उमेदवार देणार असून दोन्ही पक्ष त्याला पाठिंबा देणार आहेत, असं अजित पवार म्हणाले. मात्र देगलूरसाठी अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्रातील देगलूरसह देशातील 30 विधानसभा आणि तीन लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 नोव्हेंबर रोजी या जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये चार, आसाममध्ये पाच, मेघालय, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी तीन जागांवर विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. तर राजस्थान, बिहार आणि कर्नाटकात प्रत्येकी दोन आणि मिझोराम, तेलंगना, नागालँड, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि हरियाणात प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्र – 1 सीट
आंध्रप्रदेश- 1 सीट
आसाम- 5 सीट
बिहार- 2 सीट
हरियाणा- 1 सीट
हिमाचल प्रदेश- 3 सीट
कर्नाटक- 2 सीट
मध्य प्रदेश- 3 सीट
मेघालय- 3 सीट
मिझोरम- 1 सीट
नगालँड- 1 सीट
राजस्थान- 2 सीट
तेलंगाना- 1 सीट
पश्चिम बंगाल- 4 सीट
संबंधित बातम्या
पंढरपुरातील पराभवाचे हादरे नांदेडपर्यंत, तीन वेळा आमदार शिवसेनेचा दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर
Deglur – Biloli bypoll : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार?
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन