नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला झालाय. नवी दिल्ली मतदारसंघातील मोती नगरमध्ये रोड शो सुरु असताना एका तरुणाने ओपन जीपमध्ये चढून केजरीवालांच्या कानशिलात लगावली. यानंतर अज्ञात तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. हा तरुण दिल्लीतील 33 वर्षीय स्पेअर पार्ट विक्रेता असल्याचं बोललं जातंय.
सोशल मीडियावर नेहमीच टीकेचे धनी होणाऱ्या केजरीवालांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2014 मध्ये असाच एक प्रकार घडला होता. दिल्लीतील दक्षिणपुरी भागात रोड शो सुरु असताना एक तरुण ओपन जीपवर चढला आणि त्याने केजरीवालांनी हल्ला केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या केजरीवालांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
VIDEO : व्हिडीओ पाहा
#WATCH: A man slaps Delhi Chief Minister Arvind Kejriwal during his roadshow in Moti Nagar area. (Note: Abusive language) pic.twitter.com/laDndqOSL4
— ANI (@ANI) May 4, 2019
या हल्ल्यानंतर भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी थेट भाजपवर आरोप करत, केजरीवालांचा जीव घ्यायचाय का, असा सवाल केलाय. शिवाय केजरीवालांच्या सुरक्षेत ही गंभीर चूक असल्याचंही आम आदमी पार्टीने म्हटलंय. तर केजरीवाल अशा प्रकारचे हल्ले स्वतःच घडवून आणतात, असा पलटवार भाजपचे प्रवक्ते जफर इस्लाम यांनी केला.
केजरीवालांवरील आतापर्यंतचे हल्ले
2014 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान एका रिक्षा चालकाने केजरीवाल यांच्यावर हल्ला करत कानशिलात लगावली.
27 डिसेंबर 2014 रोजी दिल्लीमधील एका रॅलीमध्ये केजरीवाल यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये ते जखमी झाले.
2014 मध्येच त्यांच्यावर अंडीही फेकण्यात आली.