संदीप राजगोळकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 18 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहे. या भेटीआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज आमचं शिष्टमंडळ राष्ट्रपती यांना भेटणार आहे. राज्यात सुरु असलेले परिस्थिती, भविष्यात उडणारा भडका यावर आज आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सुचनेने भेटत आहोत. फक्त खासदार नाही तर आमदार देखील या शिष्टमंडळात असतील. सर्वसमावेशक शिष्टमंडळ आज भेट घेणार आहे. मराठा आंदोलनाची व्याप्ती राज्यात वाढत चालली आहे. त्याला विरोध म्हणून इतर आंदोलने उभी राहात आहेत. संसदेचं विशेष अधिवेशन राष्ट्रपती यांनी बोलावून आरक्षणाचा 50 टक्याचा कोटा वाढवावा. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, ही आमची मागणी आहे, असं संजय राऊत म्हणाले.
ठाकरे गटाचं शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटणार आहे. मराठा आणि धनगर आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी या भेटीत केली जाणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींना ठाकरे गटाच्या खासदारांनी पत्र लिहून वेळ मागितली होती. त्यानंतर आज राष्ट्रपतींना भेटण्याची वेळ ठाकरे गटाला मिळाली आहे. त्यानुसार खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहे.
1) विनायक राऊत
2) अरविंद सावंत
3) राजन विचारे
4) बंडू जाधव
5) ओमराजे निंबाळकर
6) संजय राऊत
7) प्रियंका चतुर्वेदी
8) अंबादास दानवे
9) सुनील प्रभू
10) अजय चौधरी
11) अनिल परब
मुंबईतील लोअर परळ भागातील पुलाचं उद्घाटन केल्याच्या कारणाने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर राऊतांनी भाष्य केलं. भ्रष्टाचार किती बोकालला आहे. पण त्यावर कोणी गुन्हा दाखल करत नाही. आम्ही या प्रसंगाला सामोरे जायला तयार आहोत. आम्ही असे गुन्हे दाखल झाल्याने मागे हटणार नाही. आदित्य ठाकरे यांनी जनतेसाठी त्या पुलाचं उद्घाटन केलं आहे. यात कोणतंही राजकारण नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात थांबायला वेळ आहे का? ते इतर राज्यातील प्रचारात असतील तर राज्यातील प्रश्नांचं काय? त्याकडे कोण लक्ष देणार?, असं म्हणत राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी थेट सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यावर बोलताना, हा विषय गंभीर आहे. राज्यात मंत्रिमंडळात गँगवॉर आहे. हे म्हणल्यावर माझ्यावर टीका केली. पण ते खरं आहे हे दिसत आहे.आम्ही या गंभीर प्रश्नी आज राष्ट्रपतींची भेट घेत आहोत, असं राऊत म्हणाले.