औरंगाबाद : लातूर ग्रामीण विधानसभेच्या जागेवरुन माजी मंत्री आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि काँग्रेस आमदार धिरज देशमुख यांच्यावर जोरदार टीका केलीय. त्याला देशमुख बंधूंनीही प्रत्युत्तर दिलं आहे. पण या मुद्दावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संभाजी पाटील-निलंगेकरांना जोरदार टोला लगावला आहे.(Deputy CM Ajit Pawar criticizes Sambhaji Patil Nilangekar)
संभाजी पाटील निलंगेकर मागे मंत्री होते. त्यांचं सरकार राज्यात आणि केंद्रातही होतं. तेव्हा काही केलं नाही आणि आता ढुसण्या मारत आहेत. हे धंदे बंद करा, अशा शब्दात अजित पवार यांनी संभाजी पाटील-निलंगेकर यांना फटकारलं आहे. औरंगाबादच्या विभागीय आढावा बैठकीत मंत्री अमित देशमुख तसेच भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात जुगलबंदी रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं. संभाजी पाटील निलंगेकरांचे आरोप केवळ ब्रेकिंग न्यूजसाठी होते, असा घणाघात अमित देशमुखांनी केला. अमित देशमुख यांचे धाकटे बंधू धीरज देशमुख, देवेंद्र फडणवीस यांचे पीए अभिमन्यू पवार, तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या तिघांना निवडून आणण्यासाठी तीन पक्षांचे राजकीय फिक्सिंग झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप निलंगेकरांनी केला होता.
धीरज देशमुख यांच्यासाठी लातूर ग्रामीणची जागा मॅनेज केली होती, या संभाजी पाटलांच्या आरोपावर उत्तर देताना ‘ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी केलेला तो आरोप होता’ अशी प्रतिक्रिया अमित देशमुख यांनी दिली. त्याला ‘लातूर ग्रामीणची जागा मॅनेज होती. विजयी उमेदवार हे नोटाच्या (nota) विरोधात विजयी झाले, तर पराभूत उमेदवार हेसुद्धा नोटाच्याच विरोधात पराभूत झाले’, अशा शब्दात निलंगेकरांनी प्रत्युत्तर दिलं.
लातूरमधील भाजपचे दिग्गज नेते संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी गेल्या विधानसभेला प्रचंड मोठी फिक्सिंग झाल्याचा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी केला होता. या फिक्सिंगमध्ये फक्त शिवसेना, काँग्रेसचे नेतेच नाही तर खुद्द भाजपचेही नेते होते, असंही त्यांनी सुचित केलंय. म्हणजेच फडणवीस, ठाकरे, देशमुख यांनी एकत्रित येऊन राजकीय फिक्सिंग केल्याचं त्यांनी उघडपणे सांगण्याचा प्रयत्न एका जाहीर कार्यक्रात केला होता.
संबंधित बातम्या :
Deputy CM Ajit Pawar criticizes Sambhaji Patil Nilangekar