बारामती : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांसह 4 जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केलीय. या कारवाईबाबत महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात येतोय. विरोधकांच्या या आरोपांना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. ही कारवाई सूडबुद्धीने झालेली नाही. जर तुम्ही भ्रष्टाचार केला नाही तर तुम्ही त्यात सापडू शकता का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलाय. सूडबुद्धीनं कारवाई हे चुकीचं वक्तव्य आहे. त्याला काही अर्थ नाही, असं अजित पवार म्हणाले. (Deputy CM Ajit Pawar criticizes BJP over PCMC bribery case)
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांवर कारवाई झाली तर आम्ही कारवाई केली. जर आमच्यावर कारवाई झाली तर त्या संस्थेला मुभा आहे म्हणून कारवाई झाली असतं बोलतात. वास्तविक कुणाचं तरी काहीतरी चुकलं आहे म्हणून एसीबीने कारवाई केली आहे. या कारवाईत राजकीय हेतू नाही. प्रत्येकानं पारदर्शकपणे काम करावं ही जनतेची अपेक्षा आहे. कुणी चुकीचं काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं हे एसीबीचं काम आहे. कुठेतरी पाणी मुरत असेल तर त्या लोकांना शासन करणं हे एसीबीच्या कामाचा भाग असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय.
दरम्यान, एसीबीआच्या कारवाईनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा संघर्ष सुरू झाल्याचं चित्र शहरात दिसून येत आहे. या प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. तसंच स्थायी समिती सदस्यांनी तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरीताई मिसाळ यांनी आज पिंपरी-चिचवडला भेट दिली. तिथे घडलेल्या प्रकाराबद्दल सर्व संबंधीतांशी चर्चा करुन सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणाबाबत सविस्तर अहवाल त्या मला सादर करतील आणि त्यानंतर या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. तसेच स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी पोलिस तपासात संपुर्ण सहकार्य करावे अशी सुचनाही चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. या सर्व प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल व या षडयंत्रा मागील चेहरा समाजापुढे उघड होईल असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणात राजकीय षडयंत्र आहे. लवकरात लवकर दूध का दूध, पानी का पानी होईल, असं भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी म्हटलंय. नितीन लांडगे यांना राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महापालिका निवडणूक जवळ आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पुन्हा भाजपची सत्ता येईल या भीतीने हा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही आमदार लांडगे यांनी केलाय.
संबंधित बातम्या :
स्थायी समिती अध्यक्षच लाचलुचपतच्या ताब्यात!, भाजपचा खरा चेहरा समोर, राष्ट्रवादीचा हल्लाबोल
पिंपरी-चिंचवड महापालिका लाचखोरी प्रकरण, स्थायी समितीच्या अध्यक्षांसह तिघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी
Deputy CM Ajit Pawar criticizes BJP over PCMC bribery case