“जर हिंमत असेल तर समोर या”, अजित पवारांची ‘जोडे मारो’ आंदोलनावरुन टीका; म्हणाले “रडीचा डाव…”

| Updated on: Sep 02, 2024 | 3:58 PM

महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून काल (१ सप्टेंबर) मुंबईतील गेटवे परिसरात जोडे मारा आंदोलन करण्यात आले. आता या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. ते बारामतीत बोलत होते.

जर हिंमत असेल तर समोर या, अजित पवारांची जोडे मारो आंदोलनावरुन टीका; म्हणाले रडीचा डाव...
Follow us on

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकांनीही याबद्दल आक्रमक पावित्रा घेतला आहे. या घटनेनंतर काल महाविकासआघाडीचे नेते रस्त्यावर उतरले. महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून काल (१ सप्टेंबर) मुंबईतील गेटवे परिसरात जोडे मारा आंदोलन करण्यात आले. आता या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. ते बारामतीत बोलत होते.

बारामतीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा पार पडत आहे. यावेळी अजित पवारांनी भाषण केले. या भाषणावेळी अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन राजकारण करु नका”, असा सल्लाही विरोधकांना दिला.

“राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, जे घडायला नको हवं होतं. मी त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली. पण यात ज्या कोणाची चूक असेल, त्याला शोधून काढू. ज्याने बांधकाम केलं किंवा ज्याने स्ट्रक्चरल ऑडिट देणारा जो कुणी चुकीचा असेल त्याला शोधायचं आणि शिक्षा करायची. त्यानंतर परत महाराजांच्या नावाला साजेसं भव्य स्मारक पुन्हा उभारण्यात येईल”, असे अजित पवार म्हणाले.

“हिंमत असेल तर समोर या”

यानंतर अजित पवारांनी विरोधकांच्या आंदोलनावरही निशाणा साधला. “या घटनेचे विनाकारण राजकारण करु नका. आता काहींनी जोडे मारो आंदोलन केले, आमच्या फोटोला जोडे मारलेत, अरे कसे जोडे मारतात. जर हिंमत असेल तर समोर या. मीही बघतो. हा कसला रडीचा डाव खेळताय”, अशा भाषेत अजित पवारांनी विरोधकांना सज्जड दम भरला.

“आता पुढे काय करायचं, हे तुम्ही ठरवा”

“आता लवकरच बारामतीत कॅन्सर रुग्णांसाठी रुग्णालय काढण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधान बदलणार असा चुकीचा प्रचार केला गेला. मला तुम्ही पाच वर्ष निवडून दिलं आहे, त्यामुळे आता पुढे काय करायचं, हे तुम्ही ठरवा. मी केलेल्या कामाचे पुस्तक काढून तुम्हाला देणार आहे”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.