Devendra Fadnavis Allegation Mahavikasaaghadi Government : महाविकासआघाडी सरकारच्या काळात माझ्यासह राज्यातील अनेक भाजप नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी देण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते नागपुरात बोलत होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या गौप्यस्फोटाला दुजोरा दिला आहे.
“मला अटक करण्याच्या संदर्भात किंवा भाजप नेत्यांना अटक करण्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत सत्य आहे. खोट्या केसेस करुन मला कशी अटक करता येईल, याचे षडयंत्र झालं. पण या सर्व षडयंत्रांचा आम्ही त्यावेळी पर्दाफाश करु शकलो. त्याचे व्हिडीओ पुरावेही आम्ही सीबीआयला दिले. आजही आमच्या जवळ याचे काही पुरावे आहेत”, असे खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“महाविकासआघाडी सरकारच्या काळात मी, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांसारख्या अनेक नेत्यांना अक्षरश: जेलमध्ये टाकण्याची सुपारी देण्यात आली होती. काही अधिकाऱ्यांनी ही सुपारी घेतली होती. पण त्यांना ते करता आले नाही. कारण अनेक चांगल्या अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे खोट्या केसेस दाखल करण्यास नकार दिला”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांबद्दल एक मोठं विधान केलं. सध्या त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. महाविकासआघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यासाठी सिल्व्हर ओकवर स्वतः शरद पवारांनी बैठक बोलावली होती. तसेच याबद्दल मातोश्रीवरही बैठक पार पडली, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी केला होता.