मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीतील तपशील समोर आला आहे. टीव्ही 9 मराठीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही परखड सूचना केल्या. माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विशेष सल्लागार नेमल्याने वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. (Sharad Pawar and Uddhav Thackeray meeting)
अजोय मेहता यांच्याकडून आता कोणत्या सूचना किंवा आदेश नकोत. मेहतांच्या सूचना-आदेशांवर कार्यवाही होणार नाही. वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची भूमिका आहे, असं शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तर मेहता यांच्या सूचनांनुसार काम करणार नाही असं सांगत, राजीनामा देण्याचा पवित्रा घेतल्याची माहिती मिळतेय. निवृत्त झालेल्या अजोय मेहतांना अजूनही प्रशासनात लक्ष घालू दिल्यास त्याची मोठी किंमत सरकारला तसंच व्यक्तीश: मुख्यमंत्र्यांना मोजावी लागू शकते, असे मत शरद पवार यांनी बैठकीत व्यक्त केल्याची माहिती, सूत्रांनी दिली.
प्रशासनातील नाराज अधिकारी विरोधी पक्षाला राज्य शासनाच्या कारभाराची सर्व माहिती पुरवतील आणि त्याचा सरकारला मोठा फटका बसेल, असं मत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे कळते.
राजकीय विश्लेषकांची प्रतिक्रिया
दरम्यान, याबाबत ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांनी टीव्ही 9 मराठीवर दिलेल्या प्रतिक्रियेत, सर्व राजकीय परिस्थितीचं विश्लेषण केलं. ते म्हणाले “सरकारमधील मुख्य वादाचा मुद्दा म्हणजे सुसंवादाचा आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच सूत्रं हाती घेतली आहेत, पण काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मातब्बर आहेत. त्यांना खाच खळगे, माहिती आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांची मदत घेत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे पवारांनी मुख्यमंत्र्यांना काही सूचना केल्या आहेत, त्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे तिघांमध्ये कोऑर्डिनेशन वाढलं पाहिजे. निर्णय प्रक्रियेत मंत्र्यांचा समावेश वाढवला पाहिजे, अधिकाऱ्यांमध्ये सुसूत्रता आणून त्यांचा हस्तक्षेप कमी करणे, सद्यपरिस्थितीला सामोरं कसं जाता येईल हे पाहावं”
सरकारला कसा फटका बसू शकतो?
अडीच वर्ष गृहसचिव नेमलेला नाही. महाराष्ट्रात 350 च्या वर आयएएस आहेत. आपआपल्या गोटातील अधिकारी नेमणार असाल तर दुर्दैव आहे. पवारांनी नेमकं हेच सांगितलं असेल. महाराष्ट्राची ब्युरोक्रसीचा देशात गौरव झाला, मात्र अशी परिस्थिती येणं, अधिकाऱ्यांमध्ये राजकारण येणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव असेल. अधिकाऱ्यांमधील राजकारण संपवणं, मंत्रिमंडळ आणि अधिकाऱ्यांमधील समन्वय ठेवणं हे आवश्यक आहे, असं संजय जोग म्हणाले.
अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार
महाविकास आघाडीतील वादानंतर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता (Ajoy Mehta) यांना मुदतवाढ मिळालेली नाही. गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार (Sanjay Kumar) यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. असं असलं तरी ठाकरे सरकारने अजोय मेहता यांच्यावर वेगळी जबाबदारी दिली आहे. अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली आहे.
अजोय मेहतांवरुन महाविकास आघाडीत कुरबूर
अजोय मेहता यांच्यावरुन महाविकास आघाडीत कुरबूर पाहायला मिळत होती. अजोय मेहता यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध होता. बाळासाहेब थोरात यांनी तर उघड उघड बोलत, अधिकारी सर्वस्वी नाहीत, तर मुख्यमंत्री आहेत असं म्हटलं होतं. तसंच मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवपदाचा निर्णय घेताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला विचारात घ्यावं, असं काँग्रेसने म्हटलं होतं.
(Sharad Pawar and Uddhav Thackeray meeting)
संबंधित बातम्या
थोडेसे मतभेद असतात, पण आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे : जितेंद्र आव्हाड
Ajoy Mehta | अजोय मेहतांना मुदतवाढ नाही, मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती
Breaking | अजोय मेहतांवर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज, मेहतांना हटवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी