मुंबईः राष्ट्रपदी पदाच्या उमेदवार (Presidential Candidate) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र मुंबई दौऱ्यावर आल्यावर द्रौपदी मुर्मू या मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार की नाही, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजप नेते आणि इतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यात त्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेट घेणार नाहीत. द्रौपदी मुर्मू दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास मुंबईत पोहोचतील. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच पत्रकार परिषद झाली. कॅबिनेट बैठकीत झालेल्या महत्त्वाच्या निर्णयांची त्यांनी माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी द्रौपदी मुर्मू यांची आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल की नाही, यावर थेट देवेंद्र फडणवीसांनाच प्रश्न विचारला. फडणवीसांनीही स्पष्ट उत्तर दिलं.
द्रौपदी मु्र्मू आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल की नाही, असा प्रश्न राजकीय वर्तुळाला पडला आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ द्रौपदी मुर्मू आज मुंबईत आल्या आहेत. त्यांची बैठक होणार आहे. त्यांचा कार्यक्रम माझ्याकडे आला आहे. त्यात इतर कुठली भेट नाही. त्यामुळे त्या कुणाला भेटतील याची माहिती नाही. त्यांचे प्रचारप्रमुख आणि उमेदवारांनी हा निर्णय घेतला आहे….
एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, शिंदे गटातील सर्व आमदार राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करतील. आमदार आणि खासदारही मतदान करतील. मुर्मू यांना ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचं स्वागत आहे..
भाजप सरचिटणीस सी टी रवी यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, द्रौपदी मुर्मू गोव्याचा दौरा करून महाराष्ट्रात येत आहेत. येथे त्या भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांची भेट घेतील. बऱ्याच नेत्यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्या निवडून येतील, याचा विश्वास आहे. प्रथमच आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च स्थानी बसण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे गावा-गावातील आदिवासी नागरिकांना समाधान आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची भेट होईल की नाही, याबाबत काहीही ठरवण्यात आलेले नाही. मात्र खासदारांना भेटण्यासाठी 16 जुलै रोजी एक तास देण्यात आल्याची माहिती सी टी रवी यांनी दिली.