मोदींनी आणलेल्या कृषी कायदे शेतकऱ्यांचे फायद्याचे, विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Dec 25, 2020 | 1:01 PM

भाजपचे आज (शुक्रवार) राज्यभर शेतकरी संवाद अभियान सुरु आहे.

मोदींनी आणलेल्या कृषी कायदे शेतकऱ्यांचे फायद्याचे, विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल : देवेंद्र फडणवीस
Follow us on

पुणे : भाजपचे आज (शुक्रवार) राज्यभर शेतकरी संवाद अभियान सुरु आहे. या अभियानाअंतर्गत भाजपचे विविध नेते राज्यभर तसंच देशभरात कार्यक्रम घेऊन कृषी कायद्यांचं महत्त्व पटवून देत आहेत. पुण्यातील के. के. घुले विद्यालयाच्या मैदानात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या सभेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदी सरकारच्या शेतकरी योजनांचा पाढा वाचत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं. (Devendra fadanvis Shetkari Sanvad Abhiyan over Agriculture law)

“मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि नेहमीच राहील. शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“मोदी सरकारचे कृषी कायदे म्हणजे शेतकऱ्यांना संरक्षण देणारे कृषी कायदे आहेत. सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोधकांनीअभ्यास करावा. कंत्राटी शेती करताना काही वाद झाले तर शेतकऱ्यांना कोर्टात जाता येणार आहे, हे या कायद्यात आहे. तसंच एमएसपी कुठेही रद्द होणार नाही, बाजार समिती बरखास्त केल्या जाणार नाही, हे या कायद्यात असूनही विरोधक शेतकऱ्यांना खोटं सांगून भडकवण्याचं काम करत आहेत”, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.

“शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असो वा सुल्तानी, मोदी सरकार कायम शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावलं आहे. आमचं सरकार असतानाही (फडणवीस सरकार) आम्ही कायम शेतकरी हिताची भूमिका घेतली. मात्र ठाकरे सरकारला शेतकऱ्यांना काही देणं घेणं नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोठ्या उत्साहात त्यांना मदतीची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात सरकारने मदत दिली नाही. कुठं गेला सरकारचा वादा?”, असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारला झोपडून काढले.

“राज्य सरकरने पीक विमा योजना बासनात गुंडाळून ठेवलीय. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विम्याचे या सरकारने नियम बदलल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आता मदत मिळत नाही. हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते, तेव्हा 25 हजारी हेक्टरी द्या असे म्हटले होते मात्र देण्याची वेळ आली तेव्हा 8 हजार दिले, ही दुट्टपीपणाची भूमिका आहे”, असं फडणवीस म्हणाले. ‘राजा उदार उधार झाला आणि हाती भोपळा आला’, अशी या सरकारची अवस्था असल्याची टीका फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केली.

देशात कृषी विधेयकाबद्दल गैरसमज पसरवले जातायत – हर्षवर्धन पाटील

देशात कृषी कायद्याबद्दल गैरसमज पसरवले जातायत. कृषी विधेयकाविरोधात आंदोलनं केली जात आहेत. विरोधकांना या मुद्द्याचं फक्त राजकारण करायचंय आणि त्यांना फक्त जाणूनबुजून विरोध करायचाय पण शेतकरी विरोधकांची चाल ओळखून आहे, असं भाजप नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले.

(Devendra fadanvis Shetkari Sanvad Abhiyan over Agriculture law)

हे ही वाचा

Live : केंद्राने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना संरक्षण देणारे : देवेंद्र फडणवीस

वाजपेयींचं 13 दिवसांचं सरकारही शरद पवारांनी चीत केलं?