लव्ह जिहाद हा शब्द कुठून आला? विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली…

| Updated on: Dec 20, 2022 | 3:37 PM

अशा प्रकरणांमध्ये महिलेची फसवणूक होऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

लव्ह जिहाद हा शब्द कुठून आला? विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली...
Image Credit source: Vidhansabha
Follow us on

नागपूरः राज्यात लवकरच लव्ह जिहाद (Love Jihad) कायदा आणणार असून याविषयीचा सविस्तर अभ्यास राज्य शासनातर्फे (Maharashtra Govt) केला जात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत दिली. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी श्रद्धा वालकर प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करत लव्ह जिहाद हा विषय गांभीर्याने घेण्याकडे लक्षवेधी सूचना केली. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी लव्ह जिहाद हा विषय विशिष्ट धर्म किंवा व्यक्तीविषयी द्वेषाचा नाही, हे स्पष्ट केलं. तसंच हा शब्द नेमका कुठून आला हेही सांगितलं

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘लव्ह जिहाद हा विषय सर्वात पहिल्यांदा कम्युनिस्टांच्या केरळमध्ये बाहेर आला. तेथील पोलिसांनीच हा शब्द दिला. कम्युनिस्ट मुख्यमंत्री असताना त्यांनीच ते नाव दिलंय. त्यामुळे कोणत्याही व्यक्ती किंवा धर्माच्या विरोधात हा कायदा करायचाय, असं नाहीये. आज अशा प्रकारच्या केसेस होत आहेत.

वेगवेगळ्या राज्यांनी या संदर्भात जे जे कायदे केले आहेत, त्यांचा अभ्यास आम्ही करत आहोत. त्यानुसार आपल्याकडे असा विशिष्ट कायदा करण्याची गरज असेल तर आम्ही तो करणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कोणत्याही महिलेची फसवणूक होऊ नये, यासाठी या कायद्याचा आम्ही अभ्यास करत आहोत. अशा प्रकारची आवश्यकता असेल तर निश्चित राज्य सरकार तशा प्रकारचा निर्णय घेईल, असे फडणवीस म्हणाले.

एखाद्या महिलेची तक्रार आल्यानंतर तिला तत्काळ मदत मिळाली पाहिजे. तिच्या माहितीनुसार कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. महिलेची फसवणूक होऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.