मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, आशीष शेलार आदी नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपालांनी द्यावे, अशी मागणी करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यपालांना पत्र देत सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, माननीय राज्यपालांना आज ईमेल द्वारे आणि प्रत्यक्ष अशाप्रकारे भाजपने पत्र दिलेलं आहे. या पत्रात राज्यातील आताच्या परिस्थितीचा उल्लेख केलाय. ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत. शिवेसनेचे 39 आमदार बाहेर आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत त्यांना राहायचं नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलाय. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं. असं पत्र आम्ही राज्यपालांकडे दिलंय. राज्यपालांना दिलेल्या पत्रात आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांचा उल्लेख केलाय. त्याआधारे राज्यपाल उचित निर्णय घेतील आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी योग्य तो निर्देश देतील, अशी आम्हाला आशा आहे.