मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, ते या थराला जातील असं वाटलं नव्हतं : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Dec 23, 2019 | 10:26 AM

भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारसह उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray).

मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, ते या थराला जातील असं वाटलं नव्हतं : देवेंद्र फडणवीस
Follow us on

कोल्हापूर : भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारसह उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray). मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीच, ते या थराला जातील असं वाटलं नव्हतं, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांचा भाजपप्रवेश देखील झाला (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray).

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी शिवसेनेला असा प्रश्न विचारला की काँग्रेस राष्ट्रवादीच्या जीवावर मी महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आणेल असा शब्द उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिला होता का. असा तर शब्द त्यांनी दिलाच नसेल. असा शब्द बाळासाहेबांनी कधी ऐकूनही घेतला नसता. ते म्हणाले सत्तास्थापनेसाठी मी कुठल्याही स्तरावर जायला तयार आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी पाहिलेले उद्धव ठाकरे ते नाहीत.”

आघाडी सरकारने विधानसभा अधिवेशनात केवळ औपचारिकता केली. सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसा दिला नाही. विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारने शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला. कर्जमाफी हा त्यांचा दुसरा यूटर्न आहे. संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा, 25 हजार रुपये हेक्टरी मदत अशा अनेक घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्या होत्या. मात्र, आता त्यांनी ती आश्वासनं पाळली नाहीत. जे कर्ज सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत असेल तेच माफ होणार आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा कोणताही फायदा होणार नाही, असंही फडणवीसांनी सांगितलं.

शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे त्याला आज तात्काळ मदतीची गरज आहे, उधारीची मदत नको आहे. त्याला थेट कर्जमाफी द्यायला हवी होती. त्यांनी ते न करता उधारीची कर्जमाफी केली, असा आरोप त्यांनी केला.

सरकारच्या कर्जमाफीचा कोल्हापूर, सातारा, सांगली या तीन जिल्ह्यांना फायदा होणार नाही असा आरोप केला. ते म्हणाले, “आज सर्वात जास्त मदतीची गरज अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना होती. मात्र, नेमक्या याच कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांना या योजनेचा फायदा होणार नाही. सरकारने सातबारा कोरा करण्याचं जे आश्वासन दिलं ते त्यांनी पूर्ण करावं. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळावा. आमच्या सरकारने अवकाळग्रस्त भागासाठी कर्जमाफीसाठी कोणतीही कालमर्यादा ठेवली नव्हती.”

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन समाजात तेढ निर्माण केला जात आहे. या कायद्यामुळे कोणत्याही भारतीय नागरिकाचे नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही. हा नागरिकत्व देणारा कायदा आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.