मुंबई : “नुसतं बोलून हिंदुत्व होत नसतं, हिंदुत्वाला जे मानत नाहीत, हिंदुत्वाला जे जुमानत नाहीत, अशा शक्तीसोबत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं. हिंदुत्वाबद्दल नुसते स्टेटमेंट द्यायचे. याने हिंदुत्व होत नसतं,” असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला. मुंबईत भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. यावेळी फडणवीसांनी संजय राऊत तसेच शिवसेनेवर घणाघाती टीका केली. (Devendra Fadnavis criticizes Sanjay Raut on the Hindutva ideology)
“नुसतं बोलून हिंदुत्व होत नाही. हिंदुत्वाला जे मानत नाहीत. हिंदुत्वाला जे जुमानत नाहीत. अशा शक्तींसोबत तुम्ही सत्तेत आहात. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही हिंदुत्वावर नुसते स्टेटमेंट देता. याने हिंदुत्व होत नाही, ते कृतीतही उतरवावं लागतं,” असं फडणवीस संजय राऊत यांना उद्देशून म्हणाले. तसेच तुमचं हिंदुत्व लोकांना समजलं असल्याचा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला.
पुढे बोलताना त्यांनी कलम 370 च्या मुद्द्यावरुनही संजय राऊत यांना घेरलं. फडणवीस म्हणाले, “काश्मीरमधील गुपकर आघाडीत काँग्रेस सहभागी आहे. याबाबत काँग्रेसला जाब विचारा. तुम्ही गुपकर आघाडीसोबत कसे जाता? असं त्यांना विचारा,” असे आव्हान त्यांनी राऊतांना दिले. तसेच, राऊत काँग्रेसला असे काही विचारणार नाहीत. त्यांना फक्त सत्तेची पडली आहे, असा आरोपदेखील देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर केला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी वाढीव वीज बिलांवरुन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. “ऊर्जा मंत्री तुम्ही सावकार झालात, सावकारासारखी गरिबांकडून वसुली करत आहात,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यात कोरोनाचा हाहाकार असताना या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं. शेतकरी, बाराबलुतेदार, दुकानदार, रिक्षा आणि टॅक्सीचालकांसह कुणालाच या सरकारने मदत केली नाही. तुम्ही मेला तरी चालेल पण तुम्हाला मदत करणार नाही असंच या सरकारचं धोरण राहिलं आहे. राज्यात कोरोनाचं संकट असताना या सरकारचं बदल्या करा आणि माल कमवा असंच धोरण होतं. या सरकारने बदल्या करण्याचा जणू धडाकाच लावला होता. एका बदलीसाठी चार चार एजंटांचे फोन जात होते, असा गंभीर आरोप करतानाच हे सरकार विश्वासघातकी आहे, अशी टीका त्यांनी केली. (Devendra Fadnavis criticizes Sanjay Raut on the Hindutva ideology)
संबंधित बातम्या :
मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
“उर्जा मंत्री तुम्ही सावकार झालात, सावकारासारखी गरिबांकडून वसुली करत आहात”: देवेंद्र फडणवीस
देशातील लोकांना ‘कर्मयोग’ आवडतो, ‘बोलघेवडेपणा’ नाही; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल