नवी दिल्ली : राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi ) विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजुचे नेतेमंडळी एकमेकांवर टीका टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडत नाहीत. शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आलाय. केंद्र सरकारला मसणात जावं लागेल, असा उल्लेख सामनात करण्यात आला आहे. त्याबाबत विचारलं असता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार पलटवार केलाय. ‘महाराष्ट्रात आता कायदा असा आहे की मुख्यमंत्र्यांविरोधात, सत्तारुढ पक्षाविरोधात एक अक्षरही बोललं की तर तुम्हाला किमान पाच दहा ठिकाणच्या जेलमध्ये जावं लागेल, पाच दहा ठिकाणच्या पोलिस ठाण्यात तक्रार होतील’, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावलाय.
‘महाराष्ट्रात आता कायदा असा आहे की मुख्यमंत्र्यांविरोधात, सत्तारुढ पक्षाविरोधात एक अक्षरही बोललं की तर तुम्हाला किमान पाच दहा ठिकाणच्या जेलमध्ये जावं लागेल, पाच दहा ठिकाणच्या पोलिस ठाण्यात तक्रार होतील. पण देशाच्या पंतप्रधानाबद्दल कुठलिही भाषा वापरली तर त्याचं महाराष्ट्रात स्वागत आहे, हीच परंपरा आता महाराष्ट्रं सरकारं कायम केलीय’, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. एसटी कर्मचारी आंदोलनाचं नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांनी राज्यात अनेक पोलिस ठाण्याची हवा खावी लागली. आता अभिनेत्री केतकी चितळे प्रकरणातही तेच घडत असल्यामुळे फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज नागपुरात दाखल होत आहेत. त्यावेळी ते मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याला विरोध दर्शवलाय. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, भारतात, महाराष्ट्रात किंवा नागपुरात कुठेही हनुमान चालिसा म्हणण्यावर बंदी नाही. बंदी येऊ शकत नाही. कुणी जर हनुमान चालिसा म्हणायला विरोध करत असेल तर ते अतिशय अयोग्य आहे. त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपतींबाबत भाजपनं चोमडेपणा करु नये असं संजय राऊत म्हणाले, याबाबत विचारलं असता कोण संजय राऊत? असा खोचक सवालही फडणवीस यांनी केलाय.