मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप शिवसेनेची युती तुटली आणि महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झालं. तेव्हापासून राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात टीका आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. शनिवारी बीकेसीतील मैदानातून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बाबरी मशिद आणि फडणवीसांच्या वजनावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फडणवीसांना जोरदार टोला हाणला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला रविवारी फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. ‘लक्षात ठेवा की माननीय बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्यात मैद्याच्या पोत्याच्या पायाशी नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालाय. वजनदार लोकांच्या नादी लागू नका’, असा इशाराच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.
उद्धवजी म्हणाले देवेंद्र फडणवीसांनी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता. केवढा विश्वास आहे बघा. मी लपवत नाही, आज माझं वजन 102 किलो आहे बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा 128 किलो होतं. पण उद्धवजींना ही भाषा नाही समजत. त्यांना कळणाऱ्या भाषेत सांगतो की, सामान्य माणसाचा एफएसआय जर एक असेल तर माझा 1.5 आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझा एफएसआय 2.5 होता. पण उद्धवजी तुम्हाला असं वाटतंय की माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी कराल. पण हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा की माननीय बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्याच मैद्याच्या पोत्याच्या पायाशी नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालाय. वजनदार लोकांच्या नादी लागू नका, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केलाय.
खरं म्हणजे उद्धवजींनी सांगितलं की बाळासाहेब भोळे होते आणि मी धुर्त आहे, खरं आहे. तुम्ही कुणालाही विचारा वाघ हा भोळा असतो पण धुर्त कोण असतो ते सगळ्यांना माहिती आहे. मी नाही म्हणणार… त्यांनी पातळी सोडली म्हणून आपण नाही सोडायची. बाळासाहेब वाघ होतेच.. पण आता या देशात एकच वाघ आहे, त्या वाघाचं नाव आहे नरेंद्र मोदी. ज्या मोदींनी थेट सर्जिकल स्ट्राईक केला. एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांना मारण्याचं काम केलं ते नरेंद्र मोदी. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठार मारतो तो खरा हिंदू.
पाच वर्षे तुम्ही आमच्यासोबत संसार केला. आमची संपत्ती घेऊन पळून गेलात आणि दुसऱ्यासोबत लग्न केलं. ऑफिशियल काडीमोड तरी घ्यायचा आणि म्हणे एकतर्फी प्रेम. कालचं भाषण सोनियाजींना समर्पित होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत काँग्रेसची भूमिका म्हणजेत कालचं भाषण होतं. माझा प्रश्न आहे की उद्धवजींना हे माहिती तरी आहे का डॉ. हेडगेवार यांचं नाव देशातील स्वातंत्र्यसेनानीमध्ये आहे. ज्यावेळी आणीबाणी लादली आणि सगळ्यांना जेलमध्ये टाकलं तेव्हा तुम्ही कुणाच्या बाजूने होता? असा सवाल फडणवीस यांनी केला.
‘यांच्याकडे मुद्दा नसला की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र… कुणाच्या बापाची ताकद आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायची? होय आम्हाला मुंबई वेगळी करायची आहे, पण तुमच्या भ्रष्टाचारापासून, अनाचारापासून, दूराचारापासून, अन्यायापासून वेगळी करायची आहे. रस्ते, नाली, भूयार काहीच सोडलं नाही. हे भाषण शिवसैनिकासाठी होतं तसं ते सोनियांजींसाठी होती. काल म्हणाले संभाजीनगर मी म्हणतो म्हणजे झालं ना, ‘ओ खैरे व्हा आता बहिरे… औरंगाबादचा कायम झाला खसरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोवर संभाजीनगर विसरा’. कारण कालच उद्धवजी म्हणाले मॅडम आमचा पाठिंबा काढू नका. आम्ही संभाजीनगर करत नाही आम्ही औरंगाबादच ठेवतो’, असा खोचक टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.