मुंबई | 1 मार्च 2024 : तू तुझा बामनी कावा कर मी मराठ्यांचा गनिमी कावा करतो, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. जरांगे यांनी थेट जातीवरून फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर जरांगे यांनी आपलं विधानही मागं घेतलं होतं. मात्र, या विधानाची अधूनमधून चर्चा होतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी माझी जात लपवून ठेवली नाही. मला माझ्या जातीचा अपराधबोधही होत नाही, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
टीव्ही9 मराठीने लोकसभेचा महासंग्राम कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. यावेळी त्यांनी हे विधान केलं. मी मागेही बोललो. माझी जात लपवली नाही. मी लपवून ठेवली नाही. मला त्यात अपराधबोधही वाटत नाही. असण्याचं कारण नाही. महाराष्ट्राने माझी जात मागे टाकली. महाराष्ट्राने मला स्वीकारलं. महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाने मला स्वीकारलं. मला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राने स्वीकारलंय. कोण मला सर्टिफिकेट देऊ शकतं? कुणाला अधिकार आहे सर्टिफिकेट द्यायचा? एकनाथ शिंदे साहेब म्हणाले ते योग्य आहे. महाराष्ट्राने मला स्वीकारलंय. त्यामुळे मी राज्यातील प्रत्येक समाजासाठी लढणार आहे. एखाद्या व्यक्तीने मला शिव्या दिल्या म्हणून मी थांबणार नाही. माझी जेवढी क्षमता आहे, तोपर्यंत मी काम करेन, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
फडणवीस यांनी दहा टक्के आरक्षणावरही भाष्य केलं. मराठ्यांना ओबीसीत टाकले असते तर मनभेद झाले असते. त्यांने आरक्षण वाढले नसते. जेवढे ओबीसी आरक्षणात आहेत, तेवढेच मराठा ओबीसी आरक्षणात आले असते. कुणाच्याच वाट्याला काही आलं नसतं. ओबीसीतील मोठे घटक आणि मराठा समाज यांनाच या आरक्षणाचा फायदा झाला असता. पण 300 छोट्या ओबीसी घटकांना त्या आरक्षणाचा फायदा झाला नसता. त्यांना न्याय मिळाला नसता. सामाजिक न्याय देण्याऐवजी सामाजिक अन्याय झाला असता. हा कॉन्शस निर्णय होता. ओबीसींनाही न्याय दिला पाहिजे आणि मराठा समाजालाही न्याय दिला पाहिजे, असा न्याय तत्त्वावर न्याय दिला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार यांना सोबत घेऊन बदला घेतला का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी थेट उत्तर दिलं. मी स्वत:ला चाणक्य समजत नाही. शरद पवार असतील चाणक्य. मी नाही. कोणी जर धोका दिला, विश्वासघात केला तर त्याला उत्तर दिलं पाहिजे, हे मी राजकारणात शिकलो आहे. राजकारणात अपमान होतात. सहन करता येतात. विश्वासघात सहन करायचा नसतो. पण बदला घेतला असं म्हणता येणार नाही. संधी मिळाली तर फायदा घेतला पाहिजे. तोच फायदा मी घेतला. याला पोएटीक जस्टीस म्हणतात. कालचक्र आहे. कराल तसं भरावं लागतं, असंही ते म्हणाले.