फडणवीस-शिंदे व्यासपीठावर होते, नाना पाटेकरांनी गाढवाची ‘ती’ गोष्ट सांगितली, रोख कुणाकडे?

| Updated on: Oct 12, 2022 | 12:25 PM

अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. पाहा...

फडणवीस-शिंदे व्यासपीठावर होते, नाना पाटेकरांनी गाढवाची ती गोष्ट सांगितली, रोख कुणाकडे?
Follow us on

मुंबई : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. ‘लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात’ नानांनी ही मुलाखत घेतली. यात नानांनी शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विविध प्रश्न विचारले. यात नाना पाटेककरांनी, जनमताचा कौल, वाढती लोकसंख्या, शेतकरी आत्महत्या या सारख्या मुद्द्यांवरून प्रश्न विचारले. त्याला फडणवीस-शिंदे (Eknath Shinde) यांनीही उत्तरं दिली. या मुलाखतीदरम्यान नाना पाटेकर यांनी गाढवाची एक गोष्ट सांगतली. यावेळी शिंदे-फडणवीस व्यासपीठावर होते.

गोष्ट परदेशातील आहे. राजा आणि राणी फिशिंगसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी वाटेत त्यांना एक माणूस गाढवावर बसून चालला होता. त्याच्या हातात मासे पडकडण्याचा गळ होता. त्याला राजाने प्रश्न विचारला, काय रे मासे पकडायला निघाला काय? त्यावर तो म्हणाला, नाही महाराज. आज खूप पाऊस पडणार आहे. वादळ-वारंदेखील असणार आहे. त्यामुळे मी मासेमारीला जाणार नाही.

राजा म्हणाला, मूर्ख माणसा, माझ्या हवामान खात्याच्या माणसाने मला सांगितलंय की, आज पाऊस वगैरे काही नाही. त्याला बोलून राजा पुढे जातो. पुढे गेल्यावर जोराचा पाऊस होतो. राजाला फिशिंग करता येत नाही. मग तो आपल्या राजवाड्यात परततो.

राजा त्याच्या हवामान खात्यातील पदाधिकाऱ्याला हाकलून देण्याचा आदेश देतो. तसच त्यांच्या माणसांना पाठवून त्याला बोलावून आणायला सांगतो.

राजा त्याला सांगतो की तू आतापासून माझ्यासाठी काम करायचं. तुला हवामान खात्याचा चांगला अंदाज आहे. मला हवामान खात्यातील फारसं काही कळत नाही, असं म्हणत ती व्यक्ती राजाला नकार देते. त्यावर राजा म्हणतो अरे पण परवा तर तू बरोबर अंदाज सांगितला होतास. त्यावर ती व्यक्ती म्हणते की, मी हा अंदाज वर्तवत नाही. तर माझ्या गाढवाचे कान खाली झुकलेकी समजतो आज पाऊस होणार आहे. माझं गाढव हा अंदाज सांगतं. त्यावर राजा म्हणतो की या गाढवाची हवामान खात्यासाठी निवड करा!, अशी गोष्ट नाना यांनी सांगितली.

या गोष्टीनंतर नाना पाटेकर म्हणाले, आता राजेशाही जाऊन लोकशाही आलीय. पण तरीही गाढव पाळण्याची पद्धत काही बदलली नाही!

नाना पाटेकरांच्या या विधानाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा होतेय. गाढव म्हणताना नानांचा रोख कुणाकडे होता, असा सवाल सध्या विचारला जातोय.