नागपूर : एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. आता भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील वारिस पठाण यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे (Devendra Fadnavis on Waris Pathan). या देशात 100 कोटीहून अधिक हिंदू असल्यानेच देशात कुणालाही बोलण्याचा अधिकार आहे, असाही टोला फडणवीस यांनी वारिस पठाण यांना लगावला. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “वारिस पठाण यांचं वक्तव्य निंदनीय आहे. खरंतर या देशात 100 कोटीहून अधिक हिंदू असल्यानेच देशात कुणालाही बोलण्याचा अधिकार आहे, हे वारिस पठाण यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अशाप्रकारे एखाद्या मुस्लीम राष्ट्रामध्ये कुणी बोललं असतं, तर तेथे काय अवस्था झाली असती? हे वारिस पठाण यांनी लक्षात घ्यायला हवं.”
भारत हा सहिष्णू देश आहे. हिंदू समाज हा सहिष्णू आहे. मात्र, हिंदू समाजाच्या सहिष्णूतेला जर हिंदू समाजाची दुर्बलता कुणी समजत असेल, तर तो त्यांचा मुर्खपणा ठरेल. त्यामुळे अशाप्रकारचं वक्तव्य या ठिकाणी खपवून घेतलं जाणार नाही हे पठाण यांनी लक्षात घ्यावं, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.
या वक्तव्याबद्दल वारिस पठाण यांनी माफी मागितली पाहिजे. तसेच राज्य सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Devendra Fadnavis on Waris Pathan Controversial statement