मुंबई: मी लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. त्यांच्याकडे काही सरकारी कामे आहेत. या कामांसाठी त्यांना भेटणार आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही वेळा पूर्वी स्पष्ट केलं आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. मी सर्वांनाच भेट देत असतो. त्यामुळे राऊत यांना भेट देण्यात काही अडचण नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राऊत काय बोलले मी ऐकलं नाही. मला भेट मागितली तर सर्वांनाच भेट देतो. त्यात काही अडचण नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनीच राजकारणातील कटुता दूर केली पाहिजे, असं म्हटलं होतं. या राऊत यांच्या विधानावरून फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. राजकारणातील कटूता दूर करायची असेल तर सर्वांना मिळून ठरवावी लागेल. कोणताही एक पक्ष हे ठरवू शकत नाही. नेत्यांनी शांत राहायचं आणि इतरांना बोलायला लावायचं ही पद्धतही बंद केली पाहिजे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात गोवण्यात आल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. कोर्टाने एक निर्णय दिला आहे. तो निर्णय योग्य की अयोग्य ते ईडी बोलेल. उच्च न्यायालयात प्रकरण आहे. त्यामुळे त्यावर बोलणं योग्य नाही. कोर्टाने काय म्हटलंय. त्यावर उच्च न्यायालयात काही आदेश येतील. त्यानंतर बोलू, असं त्यांनी सांगितलं.
आज शिवप्रताप दिन आहे. अफझल खानाचा वध झालेला दिवस आहे. 2007 साली कोर्टाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय दिला होता. आम्ही 2017 ला आम्ही कार्यवाही सुरू केली होती. पण कायदेशीर अडचणी होत्या. आता आम्ही पुन्हा काम सुरू केलं. कबरीजवळचं अतिक्रमण हटवण्याची शिवप्रेमीची मागणी होती. त्यांनी प्रयत्नही केले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी वन नेशन, वन इलेक्शन या धोरणाचं समर्थन केलं. वन नेशन, वन इलेक्शनला माझा पाठिंबा आहे. ही मोहीम राबवणं कठिण आहे. पण व्हायला हवं. आम्ही सुधीर मुनंगटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमली होती. या समितीने अहवाल दिला होता. त्यातील माहितीनुसार वर्षातील 365 दिवस राज्यातील कोणत्या तरी भागात आचारसंहिता असते. निवडणुका असतातच. त्यामुळे सर्वच इलेक्शन झाले पाहिजे. देशातील सर्व निवडणुका एकत्र झाल्या पाहिजे. त्यामुळे खर्च वाचेल. राजकीय नेत्यांना सोयीचं होईल, असंही ते म्हणाले.