मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बंडखोरी करत शिवसेनेतून (Shiv Sena) बाहेर पडले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना आमदारांचा एक मोठा गट देखील आहे. आपल्याला अपक्षासह एकूण 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडे असलेल्या आमदारांचा आकडा कमी झाल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मान्य केले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार संकटात आले असून, भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. काल रात्रीच देवेंद्र फडणवीस हे मुंबईतून बाहेर पडले आहेत. मात्र ते नेमके कुठे गेले याची अद्याप माहिती मिळाली नसली तरी ते दिल्ली किंवा नागपूरला जाण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुरू असताना देवेंद्र फडणवीस हे अचानक मुंबईमधून बाहेर पडल्याने तर्कवितर्कांना उधान आले आहे.
दरम्यान दुसरीकडे ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केले, त्या दिवशीपासूनच भाजपाने देखील तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिदे हे आपल्यासोबत असलेल्या आमदारांना घेऊन सुरतला पोहोचले त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी फडणवीस हे दिल्लीला पोहोचले होते. यावेळी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसंदर्भात पक्षक्षेष्ठींशी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे काल संध्याकाळी मुंबईच्या बाहेर पडले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू आहे. फडणवीस हे नागपूरला किंवा दिल्लीला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकीकडे भाजपाने सत्ता स्थापनेच्या हालाचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहेत. आपल्याकडे अपक्ष धरून पन्नासपेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये शिवसेनेसाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे उपसभापतींनी उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या अजय चौधरी यांच्या नावाला शिवसेनेचे गटनेते म्हणून मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता अजय चौधरी हेच शिवसेनेचे गटनेते असणार आहेत. हा एकनाथ शिंदे गटासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.