मुंबई: आपल्याकडे अनेक नेत्यांना चांगली भाषण करता येतात. मात्र, संघर्षाची वेळ आल्यावर हे नेते मैदानातून पळ काढतात. कोरोनाच्या काळात आपण घरात लपून बसणारे नेतेही पाहिले असतील. मात्र, प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हा आव्हानांना थेट भिडणारा नेता आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. (Devendra Fadnavis in Pravin Darekar book publication ceremoney)
ते गुरुवारी प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांची मुक्तकंठाने तारीफ केली. प्रवीण दरेकर यांनी आव्हानात्मक आणि संक्रमणाच्या काळात विरोधी पक्षनेतेपदाची धुरा हातात घेतली. माणसाचा कस हा आव्हानावेळीच लागतो. संघर्षाच्या काळात व्यक्ती कशी वागते, यावर त्याचं नेतृत्त्व जोखलं जातं, असे फडणवीस यांनी म्हटले.
मात्र, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याच्या ओघात केलेल्या काही वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. भाषणं तर अनेक लोक करतात, अनेकांना ती कला चांगली अवगतही आहे. पण मैदानात संघर्षाची वेळ आल्यानंतर घरात लपून बसणारे, मैदानातून पळ काढणारे अनेक नेते आपण पाहिले आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले. आता देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणत्या नेत्यांच्या दिशेने होता, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला असताना आणि लोकं मृत्यमुखी पडत असताना काही लोकं वेगवेगळे पॅटर्न सांगून आपल्या पाठी थोपटून घेत होते. पण समाजात जात नव्हते, समाजाचं दु:ख समजून घेत नव्हते. त्यावेळी अनेकांना रुग्णवाहिका मिळत नव्हती, लोक रस्त्यावर मरुन पडत होते. अशा काळात भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरुन काम केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या कार्यक्रमात प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कधीच काही नाही मागितलं नाही. न सांगता न मागता मला आमदार केलं आणि तसंच विरोधी पक्षनेता ही बनवलं त्यांनी मला जबाबदारी दिली. मी माझ्या नेत्याला पक्षाला आणि जनतेला उत्तर द्यायला जबाबदार आहे, असंही दरेकर म्हणाले. ज्यावेळी जंगलात वादळ आल होत तेव्हा जंगलातले वाघ बिळात बसले होते, तेव्हा प्रविण दरेकर, देवेंद्र फडणवीस सगळीकडे वादळाचा सामना करत फिरत होते, असा टोला दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. देवेंद्र फडणवीस अजूनही वस्तादच आहेत ते अजूनही या सगळ्यांशी एकटेच लढत आहेत, असं प्रवीण दरेकर म्हणाले. ज्या झाडाला फळ त्यालाच दगड मारतात, जिथे फळ नाही तिथे कोणी जात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या:
शरद पवारांना भेंडीबाजार झोंबला, आता त्यांना माझी लाज वाटणार नाही : प्रविण दरेकर
भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला आणि बेहरामपाडा म्हटलं की ‘मातोश्री’ला त्रास : आशिष शेलार
(Devendra Fadnavis in Pravin Darekar book publication ceremoney)