मुंबई : बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ठाकरे (Thackeray) सरकार कोसळल्यानंतर टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केलं. फडणवीस हे मॅच्युर्ड राजकारणी आहे, चुकीची स्टेटमेन्ट थांबली पाहिजेत, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी यावेळी केलंय. फोन लाईनवरुन टीव्ही 9 मराठीने दीपक केसरकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्रीपद त्याग करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपच्या गोटात एकच जल्लोष करण्यात आला. तसंच भाजपच्या नेत्यांनी वक्तव्य करताना संयम बाळगला पाहिजे, असंही ते म्हणालेत. बंडखोरी आम्ही आमच्या नेत्याविरोधात नाही, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात केलेली होती, असंही ते यावेळी म्हणाले. या सगळ्यात उद्धवसाहेब कुठेही दुखावले गेले नाही पाहिजे, असंही केसरकर म्हणालेत.
कुणाचंही मन दुखवायचं नसतं, हे तथ्य आम्ही जसं पाळतो, तसं तुम्हीही पाळलं पाहिजे, असं दीपक केसरकरांनी यावेळी म्हटलं. तुम्ही जर सत्तेवर येत असाल, तर त्यांना थांबवलंही पाहिजे, असंही ते म्हणाले. भाजपसोबत सत्तास्थापनेबाबत तुमचं नेमकं म्हणणं काय, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, ‘असं आम्ही आता उघड नाही करु शकत. आमचा साधारण सूर असा आहे, की काल आम्ही टीव्हीवर जे पाहिलं, शिंदे साहेबांच्या घरासमोर कुणी रिक्षावाला काही करत असेल, किंवा कुणी मॅच्युर नेता असेल, तर त्यांनी बोलताना भान बाळगावं..मर्यादा आणली पाहिजे. बोलायचं असेल तर ही ठराविक लोकं बोलतील. त्यांच्या बोलण्यात संयम असला पाहिजे..’ अशी प्रतिक्रिया दिली.
‘भाजपच्या गोटात जो काही जल्लोष झाला, त्यांच्या नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया दिसल्या, त्याने दुखावले जाणारच ना.. आम्ही बंड राष्ट्रवादी, काँग्रेस विरोधात बंड केलं होतं… आमच्या नेत्याच्या विरोधात बंड केलेलं नव्हतं.. फडणवीस मॅच्युअर्ड राजकारणी आहेत. मला एक सांगायचंय की चुकीची स्टेटमेन्ट थांबली पाहिजेत..’ असं यावेळी दीपक केसरकरांनी म्हटलंय.
दरम्यान, एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार आहेत का, याबाबतची शक्यताही केसरकरांनी यावेळी नाकारली नाही. पण अजून काही नक्की झालेलं नाही, असंही ते म्हणाले. आज पुन्हा शिंदे गटाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर बंडखोर शिंदे गट नेमका काय निर्णय घेतो आणि केव्हा मुंबईत येतो, हे पाहणं आता महत्त्वाचंय.