मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी बुधवारी एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचे भाजपमधील कट्टर प्रतिस्पर्धी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. मला एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती नाही. अधिकृतरित्या राजीनामा दिल्याचे कळल्यावरच मी यावर बोलेन. आमचे अध्यक्ष हे आधीच खडसेंसोबत बोलत आहेत, तेच याबद्द्ल सांगू शकतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
एकनाथ खडसे यांचं महाविकास आघाडीत स्वागतच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
उस्मानाबाद: एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर शुक्रवारी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्यावर एकनाथ खडसे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश
भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली. नाथाभाऊ समर्थक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर जमा झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची उत्सुकता आहे. मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार आहे.
रक्षा खडसे भाजपमध्येच?
एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
संबंधित बातम्या:
Eknath Khadse | पहिल्या निवडणुकीत पराभव ते 30 वर्ष मुक्ताईनगरवर अधिराज्य, एकनाथ खडसेंची कारकीर्द
कन्येसह राष्ट्रवादीत जाणार; सून मात्र भाजपमध्येच राहणार; नाथाभाऊंची नवी ‘खेळी’
मोठी बातमी: मोदींकडून भ्रमनिरास झाल्याचे ‘ते’ रिट्विट एकनाथ खडसेंकडून डिलीट
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना?