गजानन उमाटे, नागपूरः श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्याकांडात आता राजकारणाची एंट्री झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. श्रद्धा वालकर हिने 2020 मध्येच जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra police) नावाने लिहिलं होतं. ते पत्र माझ्याकडेपण आलंय. श्रद्धाचं ते पत्र अत्यंत गंभीर होतं. पण त्याच्यावर कारवाई का झाली नाही, माहिती नाही. या प्रकरणाची तेव्हाच गंभीर चौकशी व्हायला पाहिजे होती. अशा प्रकारच्या पत्रांवर कारवाई का होत नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
हा आरोप अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडी सरकारमधील गृहखाते तथा पोलीस विभागावर करण्यात आला आहे. तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते.
मुंबईतील पालघर येथील रहिवासी श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 2019 मध्ये मुंबईच्या एका कॉल सेंटरमध्ये श्रद्धा आणि आफताबची भेट झाली होती. त्यानंतर त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. श्रद्धाच्या घरच्यांनी विरोध करूनही तिने आफताबसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
काही काळानंतर ते मुंबईतून दिल्लीत गेले. मात्र दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आफताबने 18 मे 2022 रोजी श्रद्धाची हत्या केली. हत्येनंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले.
श्रद्धाच्या प्रेताचे एक एक तुकडे आफताब जंगलात फेकत होता. श्रद्धाचा खून केल्याची घटना उघडकीस येऊ नये म्हणून आफताबने अत्यंत थंड डोक्याने योजना आखली. तिचे सोशल मीडिया अकाउंटदेखील काही दिवस सुरु ठेवले. मात्र श्रद्धाच्या मित्राला संशय आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
आफताब पुनावालाने या घटनेची कबूली दिली असली तरीही ही घटना पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी पोलीसांचा कसून तपास सुरू आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवा आरोप केला आहे.
23 नोव्हेंबर 2020 श्रद्धाने हे पत्र लिहिलं होतं. मात्र तेव्हाच्या पोलिसांनी हे गांभीर्याने घेतलं नाही. आफताबसोबत राहण्यास मी तयार नाही. तसेच त्याने मला मारण्याची धमकीही दिली होती, असा उल्लेख पत्रात असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.