मुंबई : अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात गेले असल्याने राजकारण चांगलंच तापलंय. विरोधक सरकारवर टीका करत आहेत. तर सत्ताधारी हे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच राज्याबाहेर गेल्याचा दावा करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसंच आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत आपआपली बाजू मांडली. पण यातील खरी बाब नेमकी काय आहे? यावरून संभ्रम आहे. वेदांता प्रकल्पाबाबत (Vedanta Foxconn) माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीमुळे प्रकाश पडलाय.
माहिती अधिकार कार्यकर्ते गावडे यांची RTI दाखल केला. यात महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. वेदांता प्रकल्प राज्यात राहावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले नाहीत. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर वेदांता प्रकल्पासाठी बैठक झाली. महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाईमुळे, उदासिनतेमुळेच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेला, अशी माहिती MIDC कडून देण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पांना आवश्यक गोष्टी पुरवण्यात आल्या नाहीत. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली नाही म्हणून प्रकल्प राज्याबाहेर गेले. मी विरोधी पक्षनेता असतानादेखील या प्रकल्पांसाठी आग्रही होतो. आपल्याकडे प्रकल्प यायला हवेत, यासाठी प्रयत्न केले. प्रसंगी बैठका घेतल्या. पण महाविकास आघाडीला ते टिकवता आलं नाही. आता प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आमच्यावर आरोप केले जात आहेत, हे योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती मिळाली आहे. जानेवारी 2020 ची बातमी त्यांनी दाखवली आहे. पण त्यांनी ती बातमी नीट वाचली नाही. फॉक्सकॉन प्रकल्पाचं 2016 मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये सही केलेलं होतं. फॉक्सकॉनने तामिळनाडूत जागा बघितली, त्यानंतर ते अमेरिकेला गेला.कृपया महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नका. बदनामीचा प्रयत्न करु नका, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.